चिपळुणातील वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:39 PM2020-04-27T12:39:23+5:302020-04-27T12:40:27+5:30
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात.
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने तब्बल महिनाभर वाशिष्ठी पुलाचे काम बंद होते. मात्र, आता शासनाचे आदेश प्राप्त होताच तातडीने या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. जुना वाशिष्ठी पूल धोकादायक बनल्याने नवीन पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना महामार्ग विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. त्यामुळे शासनाचे आदेश प्राप्त होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम शुक्रवारपासून पुन्हा सुरू केले आहे. त्यापाठोपाठ आता वाशिष्ठी पुलाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
गतवर्षी पावसाळ्यात वाशिष्ठीवरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने तब्बल बारावेळा निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. अपुऱ्या कामगारांमुळे काही अडचणी येत असल्या, तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
गुहागर-विजापूर वेगात
गुहागर - विजापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामही पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरील मार्गताम्हाने ते रामपूर दरम्यानचे काम वेगाने सुरू करण्यात आले असून, मोडकाआगर पुलाचे कामही सुरू करण्यात आले आहे.