निवृत्त प्राध्यापिका शालिनी मेनन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:49+5:302021-08-20T04:36:49+5:30
रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माजी सचिव आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख शालिनी मेनन यांचे गुरुवारी ...
रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माजी सचिव आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख शालिनी मेनन यांचे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाशी (नवी मुंबई) येथे अल्प आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. शिस्तबद्ध, व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्या लोकप्रिय होत्या.
शालिनी मेनन मूळ पोफळी (ता. चिपळूण) येथील पूर्वाश्रमीच्या शालिनी काटदरे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या घरी राहून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्या पोस्टात कार्यरत होत्या. त्यानंतर त्या सौ. गोदूताई जांभेकर महिला विद्यालयात शिक्षिका होत्या. बाबुराव जोशी यांनी त्यांचा विवाह गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख कै. प्रा. मेनन यांच्याशी जुळवून दिला. लग्नानंतर त्यांनी बाहेरून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली होती. सुमारे २० वर्षांच्या सेवेनंतर त्या १९९४ साली निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या केरळमधील त्रिशूर गावी होत्या. तिथेही त्यांनी संस्कृतचे अध्यापन सुरू ठेवले होते.
मंत्रालयात संचालक असलेला मुलगा जयगोपाल यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.