कारगीलचे साक्षीदार निवृत्त सुभेदार प्रदीप चाळके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:11+5:302021-06-27T04:21:11+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील मूळचे रहिवासी व भारतीय सैन्यातील सुभेदार म्हणून निवृत्त झालेले व कारगील युद्धाचे साक्षीदार ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील मूळचे रहिवासी व भारतीय सैन्यातील सुभेदार म्हणून निवृत्त झालेले व कारगील युद्धाचे साक्षीदार सुभेदार प्रदीप गणपत चाळके यांचे मुंबई येथे निधन झाले.
चाळके हे १९७७ साली मराठा लाईट इन्फन्ट्रीद्वारे भारतीय सैन्यात भरती झाले. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी १९८२ ते ८६ सेवा केली. १९८७ ते ९१ या कालावधीत ऑपरेशन पवन श्रीलंका येथे काम केले. यात झालेल्या लहान-मोठ्या लढाईत चांगले काम उभे केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९९४ साली राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांचा राष्ट्रपती सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ऑपरेशन रक्षक नवशेरा सेक्टर येथे त्यांनी १९९५ ते १९९९ या काळात सेवा केली. १९९९ साली कारगील युद्धात ते सहभागी झाले होते. १९९९ ते २००१ अरुणाचल प्रदेश येथे ऑपरेशन फाल्कनमध्येही त्यांनी सहभाग घेतला. याचप्रमाणे २००१ ते २००२ च्या आसाम ऱ्हिनो ऑपरेशनमध्ये उत्तुंग काम केले.
२००२ साली ते सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना सेनेमध्ये भरती व्हावी याकरिता ट्रेनिंग स्कूल उभे केले. संगमेश्वर तालुक्यातील माजी सैनिक एकत्र यावेत आणि त्यांची वेगळी अशी सदनिका असावी यासाठी प्रयत्न केले. यात त्यांनी प्रबोधन सैनिक गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना केली.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ४ जुलै रोजी देवरुख येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व त्यांचे कार्य जवळून पाहिलेल्या हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साडवली येथील गृहनिर्माण संस्थेने केले आहे.