जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी, कुटुंबीय अद्याप निवृत्तीवेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:49+5:302021-04-17T04:31:49+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप न मिळाल्याने वयोवृध्द कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयाचे ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप न मिळाल्याने वयोवृध्द कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयाचे हाल होत आहेत. आर्थिक वर्ष समाप्तीचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेकडून निवृत्त वेतन बँक खात्यात जमा करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा निवृत्त वेतन देण्यात येते. मात्र, गेले सहा महिने अनेक कारणामुळे निवृत्ती वेतनास दिरंगाई होत आहे. जिल्हा परिषदेच्या वयोवृध्द कर्मचाऱ्यांनाच निवृत्ती वेतनासाठी दरमहिन्यात प्रतीक्षा करावी लागत आहे.
हजारो निवृत्त कर्मचारी असून त्यांना वयोमानाप्रमाणे विविध आजार व व्याधींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आता घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यांना उपचारासाठी वेळेवर पैसे मिळणे गरजेचे आहे. दरवर्षी मार्च महिन्यात आर्थिक वर्ष समाप्तीचे कारण पुढे करीत एप्रिल अखेरपर्यत निवृत्तीवेतन जमा केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे, त्यातच लॉकडाऊन घोषित केले आहे. कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे निदान जिल्हा परिषदेतर्फे निवृत्तीवेतन या महिन्यात तरी जमा करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.