फळपीक विमा परतावा अद्याप रखडलेलाच!
By admin | Published: September 22, 2016 12:58 AM2016-09-22T00:58:14+5:302016-09-22T00:58:14+5:30
शेतकरी वंचित : कृषी अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा
रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा व काजू या फळपिकांसाठी आॅगस्टपर्यंत परतावा देण्यात येईल, असे जाहीर करूनही सप्टेंबर निम्मा संपला तरी महाराष्ट्र शासनाने विमा परताव्याची रक्कम न दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्वरित विमा परतावा द्यावा, या मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असून, विमा कंपनीकडे त्यासंबंधी पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबईतर्फे आंबा पिकासाठी १ जानेवारी ते ३१ मे २०१६ आणि काजूपिकासाठी १ डिसेंबर २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. फळपीक विमा संरक्षण योजनेंतर्गत अवेळी पाऊस, कमी/ जास्त तापमान गारपीट याबाबींचा समावेश करण्यात आला आहे. कर्जदार - बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना जाहीर करण्यात आली होती.
यावर्षीपासून गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाचा समावेश या योजनेंतर्गत करण्यात आला आहे. काजूसाठी २५ हजार रुपये व आंबा पिकासाठी ३३ हजार रुपये अशी नुकसानभरपाईची रक्कम प्रतिहेक्टरी देण्याचे जाहीर केले होते. मूळ हवामान आणि गारपिटीच्या धोक्यापासून १ लाख ३३ हजार रुपये आणि काजू पिकासाठी १ लाख रूपये नुकसानभरपाईची रक्कम प्रतिहेक्टरी दिली जाणार होती.
आंबा पिकासाठी हेक्टरी ५ हजार ५९२ रुपये आणि काजू पिकासाठी हेक्टरी ४ हजार २०० रूपये इतकी विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांनी भरली आहे. सप्टेंबर निम्मा संपला तरी अद्याप विमा परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. कृषी विभागाशी संपर्क साधला असता अद्याप परतावा जाहीर न केल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिवाय एकूण किती शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्याची आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले. कृषी विभागाकडे शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यात येत असल्याने अखेर कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
हवामानावर आधारित प्रायोगिक तत्त्वावर फळपीक विमा योजना २०१२पासून सुरू करण्यात आली. पहिल्या वर्षी २०१२-१३ साली एकूण १५०० शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत २ कोटी ३२ लाख रुपये वितरीत करण्यात आले होते, तर २०१३-१४मध्ये १०२४ आंबा बागायतदारांना २ कोटी ७३ लाख रुपयांचे वितरण करण्यात होते. २०१४ - १५मध्ये १७७६ लाभार्थी शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख १८ हजार ६३९ रुपयांचे वितरण करण्यात आले होते.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्र आंबा पावसामुळे धोक्यात आले. तसेच जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी पीक विमा योजनेची भरपाई जाहीर करण्यास विलंब होत आहे.
याशिवाय फेब्रुवारी, मार्च २०१६ मध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. शासनाने फेबु्रवारी ते मेअखेर व्याजमाफी देण्याचा अध्यादेश काढूनसुध्दा शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये फळपीक विमा योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)