परतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:31 PM2019-10-09T17:31:33+5:302019-10-09T17:32:53+5:30
गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
रत्नागिरी : गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
वादळी परतीच्या पावसाने अनेक भागात नुकसान केले आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मंडणगड तालुक्यातील बोटी येथील हनुमंत साळुंखे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील पालघर येथील रमेश जाधव यांच्या घराचे नुकसान झाले असून गिम्हवणे येथील प्रताप जुवळे यांचा बैल विजेच्या धक्क्याने मृत झाला आहे.
गुहागर तालुक्यातील पाचेरी येथील उदय भुवड यांच्या घरावर वीज कोसळल्याने नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नांदलज सुशांत कांबळे या तेरावर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील बाईतवाडी येथील महादेव बाईत यांचे विजेमुळे वायरिंग तसेच झाडेही जळाली आहेत.