रत्नागिरीत आजपासून महसूल सप्ताह, रांगोळी स्पर्धांमधून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी
By शोभना कांबळे | Published: August 1, 2023 04:33 PM2023-08-01T16:33:38+5:302023-08-01T16:33:49+5:30
रत्नागिरी : जिल्हा प्रशासन मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात ...
रत्नागिरी : जिल्हा प्रशासन मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत असून, सोमवारी रांगोळी स्पर्धेमधून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जाणार असून, या कालावधीमध्येही विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. सोमवारी महसूल दिनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आदींमध्ये दिसून येत हाेती.
महसूल सप्ताहानिमित्त सोमवार, दि. ३१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १ ऑगस्ट रोजी महसूल दिनी महसूल कर्मचारी संघटना सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. महिला सन्मान बचत पत्र कॅपही आयोजित केला आहे. अल्पबचत सभागृहात दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचाही सत्कार होणार आहे.
२ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखले निकाली काढून त्यांचे वितरण होणार आहे. तसेच विविध दाखले-प्रमाणपत्रे यांची माहिती विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये दिली जाणार आहे. ३ रोजी ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना लाभ देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.
४ रोजी जनसंवादात विविध स्तरांवरील नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. ५ रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीचे प्रलंबित दाखले आणि प्रमाणपत्रे तत्काळ निकाली काढली जाणार आहेत. तसेच शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रलंबित जमीन वाटपाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
६ रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्या समस्यांवर आधारित उपक्रम असून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या तत्काळ मार्गी लावल्या जाणार आहेत. ७ रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार आहे.