आरजीपीपीएल् बंद झाल्याचा फटका
By admin | Published: November 12, 2014 09:39 PM2014-11-12T21:39:32+5:302014-11-12T22:51:20+5:30
आर्थिक कोंडी : ग्रामपंचायतींचे कोट्यवधी रूपये थकले; पंचायत समिती कारवाई इशारा
असगोली : गॅसच्या तुटवड्यामुळे गेले वर्षभर वीजनिर्मिती ठप्प असल्याने आरजीपीपीएल कंपनी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडली आहे. त्यामुळे त्या विद्युत प्रकल्पाकडून अंजनवेल, वेलदूर व रानवी या ग्रामपंचायतींना वार्षिक कर अदा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.
या तीनही ग्रामपंचायतींना सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट सध्या कंपनी व्यवस्थापनापुढे आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुरुवातीला ५० टक्के रक्कम तरी द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे.
सन २००२मध्ये कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने एन्रॉन दाभोळ वीज कंपनीचे रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनीत रुपांतर करुन सन २००५मध्ये एनटीपीसी व गेल या कंपन्यांनी वीजनिर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी बंद पडल्यानंतर ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळणे अशक्य वाटत होते. मात्र, ग्रामपंचायतीना सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आरजीपीपीएलने थकीत कर देण्यास सुरुवात केली. दरम्यान, आतापर्यंत कंपनी सुरळीतपणे ग्रामपंचायतींना कर देत आली आहे. परंतु वर्षभरापासून कंपनी आर्थिक कोंडीत सापडल्याने हा कर देण्यास कंपनी व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आर्थिक कोंडी झाल्यामुळे कंपनीपुढे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या.
अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन ग्रामपंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी कंपनीत जाऊन चालू वर्षातील कर मिळावा, अशी मागणी केली होती. यावेळी २५ टक्के रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. मात्र, दीड महिना झाल्यानंतरही याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने पंचायत समितीने कंपनी व्यवस्थापनाला कराबाबत बैठक घेण्याची विनंती केली. या बैठकीला सभापती राजेश बेंडल, गटविकास अधिकारी आंब्रे आदी गेले होते. परंतु यावेळी कंपनीकडून टोलवाटोलव होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही चर्चा केल्याशिवाय येथून जाणार नाही, असा पवित्रा पंचायत समितीने घेतला. यानंतर आरजीपीपीएल प्रशासनाचे अधिकारी देशमुख, व्यवस्थापक देशपांडे, अप्पर महाव्यवस्थापक आर. एस. कौल यांच्याकडे कराबद्दलचा मुद्दा रेटून धरला. सभापतींनीदेखील आक्रमक होत कंपनीकडून दरवर्षी कर अदा होत असताना त्याची तरतूद करणे व्यवस्थापनाचे काम असते. २५ टक्के रक्कम देण्याचे कबूल करुनही आश्वासन पूर्ण केले नाहीत. पूर्ण रक्कम देता येत नसेल, तर अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार या रकमेपैकी ५० टक्के रक्कम कंपनीने अदा करावी, अशी मागणी केली. कर न भरल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा सभापती बेंडल यांनी दिला आहे. (वार्ताहर)
तीनही ग्रामपंचायतींना आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट.
अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार, यापैकी ५० टक्के रक्कम अदा करण्याची मागणी.