दूषित पाणी पिण्यास योग्य असल्याचे आरजीपीपीएलचे ग्रामपंचायतीला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:33 AM2021-04-23T04:33:27+5:302021-04-23T04:33:27+5:30
असगोली : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ब्राम्हणवाडी येथील नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी यांच्या पाण्यात आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात आलेले ...
असगोली : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ब्राम्हणवाडी येथील नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी यांच्या पाण्यात आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे येथील जलस्रोत प्रदूषित आणि क्षारयुक्त झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली होती. दरम्यान, याबाबत तब्बल पंधरा दिवस उलटून गेले असून, कंपनी प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर अद्याप ब्राम्हणवाडी ग्रामस्थांना दिलेले नाही. मात्र, हे पाणी पिण्यास याेग्य असल्याचे पत्र आरजीपीपीएल कंपनीने अंजनवेल ग्रामपंचायतीला दिले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत ग्रामस्थांनी माहिती घेतली असता, प्रदूषित पाण्याचे अहवाल अद्याप वेबसाईटवर टाकण्यात आलेले नाहीत. परंतु चिपळूण येथील अधिकाऱ्यांना पाणी अहवालाबाबत ग्रामस्थांनी फोनवर विचारणा केली असता, ब्राम्हणवाडी येथील दीपक वैद्य यांचा एक झरा प्रदूषित असून त्याच भागातील अन्य झरे आणि विहिरीमधील पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगितले. येथील सगळे जलस्रोत क्षारयुक्त, मचूळ झाले असताना कंपनी व्यवस्थापनाने अंजनवेल ग्रामपंचायतीला पाण्याचे स्रोत प्रदूषित नाहीत असे अजब पत्र कसे काय दिले, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दि. ३ एप्रिल २०२१ रोजी ब्राम्हणवाडी येथील दोन झरे आणि एका विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर पुन्हा दि. ५ एप्रिल २०२१ रोजी आरजीपीपीएल प्रशासनाचा अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण येथील अधिकारी एकत्र येऊन ब्राम्हणवाडीतील झरे आणि विहिरी येथील पाणी नमुने तपासणीसाठी घेऊन गेले होते. यापैकी कोणत्याही पाणी नमुन्यांचे लेखी अहवाल अद्याप मागणी करूनही ग्रामस्थांना प्राप्त झालेले नाहीत. परंतु नेलेल्या नमुन्यांपैकी दोन झऱ्यांचे पाणी पूर्णतः प्रदूषित असून ते पिण्यास अयोग्य असल्याचे ते पाणी पाहिल्यावर, चव घेतल्यावर कुणीही सांगेल. परंतु हे पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्राद्वारे कंपनीला कसा काय दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ब्राम्हणवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले की, पूर्वीचा एन्रॉन वीज प्रकल्प किंवा आताचा आरजीपीपीएल प्रकल्प असेल, गेल्या २५ वर्षांत आम्ही कधीही व्यक्तिगत नोकऱ्या, ठेका मागायला किंवा अन्य कुठलीही दादागिरी करायला कंपनीकडे गेलेलो नाही. सध्या उन्हाळी हंगामामुळे ग्रामपंचायत अंजनवेल यांची पाणी पुरवठ्याची विहीर आणि वर उल्लेख केलेल्या आठ वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत यांचे कंपनीमुळे प्रदूषणाचे भयाण व उग्र रूप पुढे आले, तर अंजनवेल गाव ऐन उन्हाळ्यात पूर्ण तहानलेला राहण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.