छंदोत्सवात रंगली सूर-तालांची लय
By admin | Published: December 23, 2014 11:33 PM2014-12-23T23:33:07+5:302014-12-23T23:40:41+5:30
अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालय : तरूणाईच्या जल्लोषात स्नेहसंमेलन सुरु
रत्नागिरी : अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय छंदोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यावेळी सूर आणि ताल यांची सुरेल लय रंगली आणि त्यात तरूणाई न्हाऊन गेली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, रंगकर्मी व व्यावसायिक उदय लोध, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विजय देसाई, सदस्य मंदार सावंतदेसाई, पर्यवेक्षक प्रा. विशाखा सकपाळ, एमसीव्हीसी विभागाचे पर्यवेक्षक प्रा. माधव पालकर, छंदोत्सवप्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, विभागप्रमुख प्रा. माणिक बाबर, प्रा. चिंतामणी दामले, प्रा. सुशील वाघधरे उपस्थित होते.
एमसीव्हीसी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या ढोल व झांज पथकाच्या साथीने नटराजाची पालखी खातू नाट्यमंदिरच्या सुशोभित व्यासपीठाकडे आणण्यात आली. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या साथीने या दिंडीची रंगत अधिकच वाढली होती. दिंडीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या साथीने या दिंडीची रंगत अधिकच वाढली होती. दिंडीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक पोषाखात दिंडीत सहभागी झाले होते. महेश नाईक यांनी कोकणातील पारंपरिक पद्धतीने नटराजाला छंदोत्सवाच्या यशस्वी पूर्ततेबाबत गाऱ्हाणे घातले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवाच्या व्यासपीठावर पहिली पावले टाकून पुढे कलाक्षेत्रात यशवंत झालेल्या विद्यार्थ्यांकरिता दिला जाणारा घंटानाद सन्मान रेडिओ जॉकी, अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या सिमरन डिंगणकर हिला देण्यात आला. यानंतर गीतगायन स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचे परीक्षण राम तांबे आणि नरेंद्र रानडे यांनी केले. स्पर्धेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदिती घाणेकर, राजवी काणे, कस्तुरी भागवत, प्राजक्ता जोशी व तैबा बोरकर यांनी उत्तमरित्या पार पाडली. पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने सुंदर वातावरण निर्माण झालेल्या मैफिलीत कजरा मोहब्बतवाला सारख्या लोकप्रिय कव्वालीपासून मला जाऊ देसारख्या लावणीपर्यंत सर्व प्रकारची गीते सादर झाली. आधुनिक बॉलिवूड गीतांपासून ते अगदी हिंदी चित्रगीतांच्या सुवर्ण काळातील गीताची निवड विद्यार्थ्यांनी केली होती. सर्व गीतांना श्रोत्यांची भरभरुन दाद मिळाली. स्पर्धेत सतरा गीतांचे सादरीकरण झाले. गीतगायन स्पर्धेनंतर समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. बीना कळंबटे आणि किरण बोरसुतकर यांनी केले. माणिक देसाई, गिरीष व वर्धमान या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. फ्युजन क्लासिकल, मोरया ब्रेथलेस, पारंपरिक लोकनृत्ये वेशभूषा, सादरीकरण, संगीत, नृत्य कौशल्य या सर्व अंगांनी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. (प्रतिनिधी)