भात खरेदी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:52+5:302021-09-19T04:31:52+5:30
रत्नागिरी : आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात १४ केंद्रावर भात खरेदी होणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले ...
रत्नागिरी : आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात १४ केंद्रावर भात खरेदी होणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली. भात खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक कागदपत्रांसह नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.
मार्गदर्शन शिबिर
गुहागर: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिवसाचे आयोजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती देऊन करण्यात आले. प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर, प्राचार्य धनंजय दळवी, निसर्ग मंच प्रमुख प्राचार्य मयुरेश राणे यांनी ओझोनच्या महत्त्वाचा आढावा घेतला.
परसबागेत विसर्जन
चिपळूण : पर्यावरण संतुलन ही काळाची गरज ओळखून नायशी येथील घाग कुटुंबीयांनी सदगुरु पै वामन माऊली यांनी व राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला दाद देत निसर्गरक्षणाला हातभार लावत आपल्या परसबागेत गणरायाचे विसर्जन केले. हे दुसरे वर्ष असल्याची माहिती नायशी गावचे उपसरपंच संदीप घाग यांनी दिली.
मनसेत प्रवेश
देवरुख : नजीकच्या पाटगाव येथील शिवसेनेचे माजी शाखाध्यक्ष आत्माराम गोपाळ व सहकारी आणि साडवली पोतरेवाडी येथील ३० युवकांनी नुकताच मनसे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश शिवाजी चौक येथील मनसे कार्यालयात पार पडला. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांच्या उपस्थित पार पडला.
पावसाची विश्रांती
दापोली : गेले काही दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली असून, कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. यामुळे उष्म्यात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही दिवस पावसाने दापोलीकरांना झोडपून काढले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
पोषणमूल्य दिन
दापोली : डाॅ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पोषणमूल्य दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डाॅ. संजय भावे होते. यावेळी विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबडा भोपळा, घोसाळी, दुधी भोपळा आदी भाजीपाला बियाणे तसेच आंबा, फणस, जाम, जांभूळ,या फळझाडांच्या कलमांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
ऑनलाईन सभा
खेड : शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. पतसंस्था अध्यक्ष संजय मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यावेळी बहुसंख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन पतसंस्था तर्फे करण्यात आले आहे.
रेल्वे बुकिंग सुरु
रत्नागिरी : जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी तसेच कोकण कन्या स्पेशल गाड्यांचे आगाऊ आरक्षण दिनांक २० सप्टेंबरपासून पीआरएस तसेच आयआरटीसी संकेतस्थळावर ऑनलाईन सुरु होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी लोकेंद्रकुमार वर्मा यांनी दिली.