कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:41+5:302021-06-25T04:22:41+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक ...
रत्नागिरी : कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊननंतरही रिक्षा व्यवसायाची अवस्था फार वाईट झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ४ साप्ताहिक गाड्या
रत्नागिरी : राज्यात अनलॉकची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णत: आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णांना मदतीचा हात
गुहागर : भाजप ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात पुढे राहून दुसऱ्या लाटेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे.
वृध्द शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी : जाकादेवी - खालगाव येथील ग्रामस्थ नामदेव देसाई यांचे संपूर्ण घर दीड महिन्यापूर्वी आलेल्या तौक्ते वादळात जमीनदोस्त झाले होते. महसूलकडून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तरीही देसाई यांना अद्याप मदतीचा लाभ मिळालेला नाही.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
चिपळूण : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. या कार्यालयाच्या शेडमध्ये अधिकाऱ्यांनी आपली दुचाकी वाहने उभी केली असल्याने सदनिका नोंदणी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शेडबाहेर तिष्ठत राहावे लागते.
सेंद्रिय अन्न पदार्थ चाचणी
रत्नागिरी : जिल्ह्यात अन्न आयुक्त यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये विविध मिठाईची दुकाने, अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने यांच्यावर लक्ष ठेवताना सेंद्रिय अन्न पदार्थ चाचणीची मोहीम अन्न आयुक्त संजय नारागडे यांनी सुरू केली आहे.
वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष
देवरुख : संगमेश्वर - साखरपा राज्य मार्गावर सह्याद्रीनगरजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर नियमित संध्याकाळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पंपासमोर बहुसंख्य खासगी आराम बस उभ्या केल्या जात असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.
चारसूत्री भातलागवड प्रात्यक्षिक
कडवई : संगमेश्वर तालुक्यातील मौजे अंत्रवली येथे संजीवनी मोहिमेअंतर्गत चारसूत्री पध्दतीने भात लावणी प्रात्यक्षिक व शेती-शाळा वर्ग शेतकरी आत्माराम माईन यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आला. यावेळी मंडल कृषी अधिकारी वाय. एस. सुरडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
निवासस्थानापासून वंचित
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना निवासाची व्यवस्था नसल्याने भाड्याच्या घरातच राहावे लागत आहे. शासनाने त्यांच्यासाठी चांगल्या जागेमध्ये निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
खेड - वडगाव बसफेरीची मागणी
खेड : खेड - वडगाव एस. टी. बससेवा पुन्हा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांना दिले आहे. खेड - वडगाव ही बसफेरी बंद असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.