चिपळुणातील अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:13+5:302021-06-24T04:22:13+5:30
चिपळूण : कराड-चिपळूण मार्गावरील पिंपळी येथे रिक्षा आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालक गणेश जयराम चिले (वय ...
चिपळूण : कराड-चिपळूण मार्गावरील पिंपळी येथे रिक्षा आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालक गणेश जयराम चिले (वय ४२) याचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील ३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. येथील पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली असून, स्विफ्ट चालकावर गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण-कराड राष्ट्रीय मार्गावर स्विफ्ट कार चिपळूणकडे येत होती. त्याचदरम्यान शिरगाव गयाळवाडी येथील गणेश चिले हा रिक्षा घेऊन शिरगावच्या दिशेने जात होता. रिक्षात ३ प्रवासी होते. चिपळूण-कराड मार्गावर पिंपळी येथे स्विफ्टने रिक्षाला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षा कित्येक फूट लांब उडून पाण्याच्या नाल्यात दगडावर आपटली.
अपघात घडताच रस्त्यावरील वाहनचालक तसेच आजूबाजूच्या तरुणांनी तत्काळ धाव घेतली. रिक्षाचालक तसेच प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तोपर्यंत रिक्षाचालक गणेश जयराम चिले यांची प्राणज्योत मालवली होती. रिक्षातील प्रवासी संदेश अमृतराव शिंदे, सानवी संदेश शिंदे आणि प्रज्ञा पालांडे (सर्व रा. शिरगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन प्रथम वाहतूक सुरळीत केली. तसेच पंचनामा करत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. स्विफ्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरा सुरू होते.