चक्क नाेकरदारांनीच घेतले रिक्षा परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:03+5:302021-07-17T04:25:03+5:30
तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने ...
तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने नियमाप्रमाणे कायद्याने बेरोजगार व्यक्तींनीच घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, माहिती लपवून खोटे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करून राज्य केंद्र सरकारी नोकरदारांनी रिक्षा परवाने घेतल्याची माहिती राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेने दिली आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाने परवानाधारक ऑनलाईन फॉर्म माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षा परवानाधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे.
आर्थिक सुबत्ता चांगली असतानाही रेल्वे, बँक, एसटी महामंडळ , इतर महामंडळे, नगरपालिका, मल्टिनॅशनल कंपनी व इतर खासगी कंपनीमध्ये कामाला असताना अनेक नोकरदारांनी मोठ्या संख्येने रिक्षा परवाने व रिक्षा घेतल्या व भाड्याने विनालायसन्स बॅच अप्प्रवृत्ती चालकांना चालवायला दिल्या जात आहेत. त्यामुळे गरज नसताना रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यातून गुन्हेगारी वाढली, तक्रारी वाढल्या आहेत. अप्प्रवृत्तीमुळे प्रामाणिक रिक्षावाला व रिक्षा व्यवसाय बदनाम झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शासन घोषित परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान प्राप्ती आहे. ऑनलाईन अर्ज भरताना खोटी माहिती देऊन रिक्षा परमिट काढलेल्या नोकरदारांचे पितळ उघडे पडेल म्हणून अनेक नोकरदार परमिटधारक अर्थसाहाय्य अर्ज भरत नाहीत. शासकीय नोकरदारांची प्रायव्हेट फंड व माहिती ऑनलाईन असल्यामुळे जाहीर होईल. परिवहन प्रशासन आरटीओने परवानाधारक ऑनलाईन अर्ज माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षापरवानाधारक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी. व सदर रिक्षा व परमीट लायसन्स बॅच असलेल्या गरजू बेरोजगारास द्यावी जेणेकरून बजबजपुरी व अप्प्रवृत्तीला आळा बसेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास राजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव व सचिव संतोष सातोसे यांनी दिला आहे.