रिक्षा दिसल्यास कारवाई करणार - वाहतुकीला परवानगी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 04:30 PM2020-05-04T16:30:36+5:302020-05-04T16:30:41+5:30
रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, ...
रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, रस्त्यावर रिक्षा दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिला आहे.
सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणण्यात आली आहे. आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकाने स्वयंशिस्तीने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियमांमध्ये शिथिलता आणताना काही कडक निर्बंधही घालण्यात आले आहेत.
शासनाने नवीन नियमानुसार चारचाकी वाहनातून चालक आणि त्याचे सोबत अन्य दोन प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकते, असे सांगण्यात आले आहे.
सोमवारी नियम शिथील केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांसह वाहनांचीही गर्दी दिसत होती. त्यातच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने रिक्षा व्यावसायालाही परवानगी दिल्याचा अनेकांनी समज करून घेतला. त्यामुळे सोमवारी अनेक रिक्षाचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली होती. गेले दीड महिन्यापासून व्यवसाय बंद ठेवून राहिलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाला पुन्हा सुरूवात केली. मात्र, त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.
याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.