रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील पदे भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार-राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:37 PM2018-11-20T17:37:56+5:302018-11-20T17:40:02+5:30
जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली.
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना तत्काळ हजर करून घेण्याचे अधिकार आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.
राजापूर, रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालये व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टरांची अनुपलब्धता हा प्रश्न ऐरणीवर असून इतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन आमदार राजन साळवी यांनी समस्या जाणून घेतल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘जिल्हा रूग्णालयाकडे आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन राजन साळवी यांनी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन यशस्वी चर्चा केली. त्यासमयी आरोग्य संचालक डॉ. कांबळे, सहसंचालक डॉ. आंबडेकर उपस्थित होते.
भेटीदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी फोनवरून चर्चा करून देत ही समस्या गंभीर असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. विषयाचे गांभिर्य लक्षात घेता आरोग्यमंत्री सावंत यांनी तत्काळ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला येणाºया उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना तत्काळ हजर करून घेण्याचे अधिकार दिले. ज्यामुळे येणाऱ्या उमेदवारांना त्वरित नोकरी मिळून कामावर रुजू होण्यास मदत होणार आहे.
तसेच राजन साळवी यांनी आरोग्यमंत्री सावंत यांचे लक्ष वेधत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे बंद अवस्थेत असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलीसीस मशीन व प्रतीक्षागृहाची आवश्यकता या समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी त्वरित माहिती मागवून आवश्यक असलेले सिटीस्कॅन मशीन व ४ डायलिसिस मशिन्स हे मंजूर झाल्याचे सांगितले.