भातगाव कोसबी शाळेत ‘रिंग द बेल फॉर वॉटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:54 PM2019-11-18T23:54:37+5:302019-11-18T23:55:01+5:30
रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी ...
रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी घंटा अथवा बेल वाजविली जाते. मात्र, नियमित शाळा भरण्याच्या, सुटण्याच्या वेळा, जेवणाची सुटी, व दोन सत्रातील दोन छोट्या सुट्यांसाठी बेल वाजवित असताना आता नवीन बेल सुरू करण्यात आली आहे. ही बेल वाजताच विद्यार्थी आपापल्या पाण्याच्या बाटल्या काढून त्यातील पाणी पित आहेत. भातगाव-कोसबी शाळेमध्ये ‘रिंग द बेल फॉर वॉटर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ‘रिंग द बेल फॉर वॉटर’ या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.
दिवसात किमान दोन ते तीन लीटर पाणी शरीराला आवश्यक आहे. मात्र, मुले एवढे पाणी पित नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन कोसबी शाळेच्या शिक्षकांनी पाणी पिण्यासाठी बेल वाजविण्याचा निर्णय घेतला, शिवाय अंमलबजावणीही सुरू केली आहे. पाणी पिण्यासाठी बेल देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती, त्यानंतर दिवसातून ठराविक वेळी बेल वाजविली जाते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी जेवढी तहान असेल तेवढे पाणी पितात. पहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.
आरोग्य विज्ञानानुसार पाणी नियमितपणे प्यायल्याने मूत्रावाटे क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी असते. आपल्या शरीरात ६0 टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील विषारी पदार्थांचे विसर्जन या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा उपक्रम मुख्याध्यापक संतोष रावणंग व सहकारी शिक्षक शाळेमध्ये राबवित असून, या उपक्रमाचे ग्रामस्थांकडूनही विशेष कौतुक होत आहे.
चळवळ व्हावी
बदलत्या तापमानामुळे उष्मा आता तीव्रपणे जाणवू लागला आहे. अशा दिवसात कमी पाण्यामुळे मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर ‘पाण्यासाठी घंटा’ अशा माध्यमातून शाळांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘पाण्यासाठी घंटा’ हा केवळ उपक्रम न राहता एक चळवळ म्हणून सर्वत्र पसरण्याची गरज आहे.