वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परीक्षांबाबत पालकांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:35 PM2021-03-30T15:35:00+5:302021-03-30T15:35:33+5:30
CoronaVirus School Ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १०,८४८ इतका झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला, तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १०,८४८ इतका झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला, तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
गतवर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दि.१५ मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोरोना रुग्णवाढीमुळे ऑनलाईन अध्यापन पद्धतीचा पर्याय निवडण्यात आला. पहिले शैक्षणिक वर्ष व त्या सत्रातील चाचणी व सहामाही परीक्षा ऑनलाईनच घेण्यात आल्या. नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. जिल्ह्यातील ४५४ शाळांपैकी ४११ शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. एकूण ८२,०६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१,३८५ इतके विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मात्र ऑनलाईन अध्यापन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना पाल्यांना शाळेत पाठवावे लागत आहे. त्यातच वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नववी व अकरावीच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगतच मुले शाळेत जात आहेत.
जिल्ह्यात महिनाभरात तब्बल ८०८ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला केवळ १७ रुग्ण आढळले होते. मात्र त्यानंतर, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली. २७ मार्च रोजी तर तब्बल ११६ कोरोना रुग्ण सापडले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका शाळेतील शिक्षक कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली होती.
एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरूच असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभाग मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा सूर उमटत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन अध्यापन झाले. पाचवी ते आठवीचे वर्ग फेब्रुवारीत सुरू करण्यात आले. आतापर्यंत शाळेतील अध्यापन रास्त होते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने, वाढत असताना शाळा सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी? ऑनलाईनच वार्षिक परीक्षा घेणे शक्य असताना, नाहक मुलांच्या आरोग्याशी शासन खेळत आहे.
- कविता मोरे, पालक
शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना शाळांना प्राप्त झालेल्या नाहीत, परंतु शाळा व्यवस्थापन समित्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ शकतात, असे जरी शासनाकडून सूचित केले जात असले, तरी निर्णय घेण्यासाठी कोणतीही शाळा पुढे येत नाही. लहान मुलांच्या आरोग्याचा, सुरक्षेचा प्रश्न असल्याने विद्यार्थी हितार्थ योग्य व वेळेवर निर्णय घेणे गरजेचे आहे.
- रविकांत पाटील, पालक