रमजानमुळे फळांना वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:42+5:302021-04-26T04:28:42+5:30
रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी ...
रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात सर्व प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी भाजीपाला, फळे विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. विक्रीसाठी फळे बाजारात उपलब्ध असून, मागणीही वाढती आहे. सफरचंद १८० ते २५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मोसंबी १८० ते २००, संत्री १५० ते १८० रुपये, चिकू ७० रुपये, पेरू ८० रुपये, कलिंगड २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पपई ४० ते ५० रुपये नग, अननस ४० ते ६० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. पेर १८० ते २०० रुपये किलो, टरबूज ७० ते ८० रुपये प्रतिनग, द्राक्ष ६० ते ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खजूर ७० ते ५०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. विदेशी खजूर बाजारात मुबलक स्वरूपात विक्रीला आला असून, काळ्या सीडलेस खजुराला विशेष मागणी होत आहे. रमजानमुळे शहाळ्यांना मागणी वाढली आहे. ३५ ते ४० रुपये नग दराने शहाळे विक्री सुरू आहे. याशिवाय आंबा विक्रीला आला असला तरी दर मात्र अद्याप परवडणारे नाहीत.
पाण्याची पातळी खालावल्यामुळे बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. वांगी ५० ते ६० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये, फ्लॉवर ४० ते ५० रुपये, कांदा १५ ते २० रुपये, बटाटा २२ ते २५ रुपये, आले ५० ते ५५ रुपये, मिरची ६० ते ७० रुपये, सिमला मिरची ५० ते ६० रुपये, गाजर ६० रुपये, मटार १०० ते १२० रुपये, फरसबी १२० रुपये, कोबी ४० रुपये, भेंडी ८० रुपये, गवार ७० रुपये, घेवडा ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. उन्हाळ्यात कोशिंबीरसाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे काकडीला विशेष मागणी असून, ५० ते ६० रुपये किलो दराने काकडीचा खप सुरू आहे.
मुळा, माठ, मेथी, शेपू, पालकच्या जुड्या १५ ते २० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जुडी २० ते २५ रुपये दराने विक्री होत आहे. कोरोनामुळे भाजी विक्रेते दारावर भाज्या घेऊन येत असले तरी दर मात्र चांगलेच वधारलेले आहेत. उन्हामुळे लिंबाचाही खप वाढला आहे. लिंबू १० रुपयांना २ नग दराने विक्री होत आहे.