खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरूच, सर्वसामान्य चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:04+5:302021-05-31T04:23:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत असल्याने फोडणी महागली आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण नसल्याने दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरामुळे पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी आखडता हात घेतला आहे.
लाॅकडाऊन सुरू असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कडधान्य, डाळी, तेलाची आवक वाशी (नवी मुंबई) व कोल्हापूर येथून होते. होलसेल मार्केटमध्येच दर वाढल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. भाज्यांच्या दराने तर शंभरी गाठली आहे. डाळी व कडधान्यांच्या दरानेही शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकातील ‘डाळभात’सुध्दा महागला आहे. लाॅकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम झाल्याने गोरगरिबांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळणे अवघड झाले आहे.
सूर्यफूल, शेंगदाणा, कापूस, सोयाबीन तेलाच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. या तेलांची १२० ते १८५ रूपये लीटर दराने विक्री करण्यात येत आहे. बारा लीटर तेलाचा बाॅक्स २०२० रूपये तर १५ लीटरच्या डब्याची दोन हजार ७७५ रूपये दराने विक्री सुरू आहे. खाद्यतेलांच्या दरातील वाढ खाद्यपदार्थाचे दरावर होण्याची शक्यता आहे.
तांदळाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अखंड तांदूळ ४० ते ८५ रूपयांपर्यंत तर तुकडा तांदूळ ३२ ते ३५ रूपये किलाे दराने विकण्यात येत आहे. ३२० ते ३५० रूपये दराने दहा किलोच्या पिशवीची विक्री सुरू आहे.
गेले वर्षभर साखरेचे भाव मात्र स्थिर आहेत. घाऊक ३२ रूपये तर किरकोळ ३५ रूपये किलाे दराने साखर विक्री सुरू आहे. साखरेसह गुळालाही मागणी होत आहे. ६० ते ७० रूपये किलो दराने गूळ विक्री होत असून, सेंद्रिय गुळाला विशेष मागणी होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातून कच्चा माल निर्यात केला जात असताना, दरावर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
- राधिका पाटील, गृहिणी
कोरोनामुळे आर्थिक संकट उद्भवले असतानाच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शासनाचे वाढत्या दरावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अन्यथा दरवाढ भूकबळीचे कारण ठरू शकते.
- उषा नाईक, गृहिणी