हजेरीसाठी येणाऱ्या वाहक-चालकांना कोरोना संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:59+5:302021-04-20T04:32:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आले असल्याने एस.टी.ची प्रवासी वाहतूक अंशत: सुरू आहे. प्रत्यक्षात चालक, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आले असल्याने एस.टी.ची प्रवासी वाहतूक अंशत: सुरू आहे. प्रत्यक्षात चालक, वाहकांची कमी आवश्यकता भासत आहे. मात्र, तरीही हजेरीच्या नावाखाली नियमित चालक, वाहकांना आगारात बोलावले जाते. हजेरीसाठी आगारात नियमित यावे लागत असल्याने चालक, वाहकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. आवश्यक चालक, वाहकांनाच बोलावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.
एस. टी. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन उपलब्ध साधनांचा योग्य वापर करीत अचूक नियोजन केले पाहिजे. जेणेकरून एस. टी. कर्मचारी कमीत कमी संक्रमणात व संपर्कात येतील. प्रत्यक्षात काम करताना तसे प्रयत्न असल्याचे जाणवत नाही. विभागीय कार्यालय हे ५० टक्के हजेरीवर सुरू असून, आगार पातळीवर मात्र वेगळ्या पद्धतीने काम सुरू आहे. वाहतूक कमी प्रमाणात सुरू असूनही चालक, वाहकांना हजेरी लावण्यासाठी आगारात बोलाविण्यात येत आहे.
संक्रमण काळातील (लॉकडाऊन कामबंद) वेतन आजपर्यंत कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने किंबहुना परिपत्रकीय सूचना असतानाही स्थानिक एस. टी. प्रशासनाने जाणीवपूर्वक न दिल्याने भीतीपोटी कामगार हजेरीसाठी उपस्थित राहत आहेत. याबाबत कामगारांनी अधिकची विचारणा केली असता काही अधिकारी आपल्याला आदेश असल्याचे कामगारांना सांगितले जात आहे. त्यामुळे याबाबत लक्ष घालून कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे रक्षण करावे, असे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. आगाराच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत साळवी यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवले असून, निवेदनाची पत्राची प्रत त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आ. राजन साळवी यांनाही पाठवले आहे.
कोट घ्यावा
मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार सर्व आगारांना चालक, वाहकांना हजेरीसाठी बोलावण्याची सूचना केली आहे. मात्र, गर्दी होणार नाही, याची काळजी घेत नियोजन करण्याचे सूचित केले आहे. हजेरी अत्यावश्यक असल्याने आगारप्रमुखांच्या सूचनेनुसार चालक, वाहकांनी उपस्थित राहायचे आहे.
- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.