ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:55+5:302021-07-19T04:20:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या ...

Risk of hitting average points | ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल लावत असताना दहावी, अकरावी व बारावीचे गुण एकत्रित करत विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज गुण काढण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.

दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुण घेऊन तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण दिले जाणार आहेत. मात्र, याचा फटका मुलांना बसण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना दहावीला चांगले गुण असतात, मात्र अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ते बारावीच्या तयारीमुळे अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानले जाते. त्यामुळे अकरावीत फारसे अभ्यासावर लक्ष न देता, पास होण्यापुरते गुण मिळवले जातात. त्यामुळे अकरावीला जर कमी गुण मिळालेले असतील, अशा मुलांना अकरावीचे ३० टक्के गुण धरताना नुकसान होणार आहे. एकूणच दहावीत चांगली गुणवत्ता आहे, मात्र अकरावीचे गुण कमी आहेत. बारावीची परीक्षाच झालेली नसल्याने वर्षभरातील एकूण कामगिरीबद्दल ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे दहावीला विशेष गुणवत्ता असली तरी अकरावीचे कमी गुण व बारावीत तर एकूण सादरीकरणावरून गुण ग्राह्य धरले जाणार असले तरी मुलांना यामुळे कमी गुण प्राप्त होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून निकषात बदल करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापनाचा प्रकार नवीन होता. बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य न झाल्याने परीक्षा रद्द करून निकालासाठी दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांवरून सूत्र ठरविण्यात आले आहे. ॲव्हरेज गुणांमुळे आमचे नुकसान होणार आहे.

- श्रावणी पाटील, विद्यार्थिनी

दहावीला चांगले गुण मिळवले होते. मात्र, पुढील बारावीचे वर्ष असल्याने अकरावीच्या वर्षात अभ्यासाकडे फारसे लक्ष दिले नव्हते, परंतु बारावीच्या वर्षात सुरूवातीपासून अभ्यास करत होतो. शासनाने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण देत परीक्षा रद्द केली. परंतु, सरासरी गुणात घसरण होण्याचा धोका आहे

- आर्य देसाई, विद्यार्थी

दहावीला, अकरावीला कमी गुण मिळविणारे विद्यार्थी बारावीला चांगले गुण मिळवू शकतात. त्यामुळे तीन वर्षांचे गुण एकत्रित करून ॲव्हरेजव्दारे गुण देण्याची पध्दत अयोग्य असून, त्यामध्ये शासनाने बदल करण्याची आवश्यकता आहे.

- ईशानी आंबेकर, विद्यार्थिनी

दहावी, अकरावी बारावीच्या गुणांवरून ॲव्हरेज गुण देण्याच्या पध्दतीचा वापर करताना, गुणांचा डोंगर वाढण्याबरोबर काही मुलांवर अन्यायही होण्याचा धोका आहे. प्रत्यक्ष परीक्षेनंतरचे गुण व ॲव्हरेज गुण यामध्ये फरक आहे. यामध्ये आमचेच नुकसान आहे.

- ऋजुल कुलकर्णी, विद्यार्थी

Web Title: Risk of hitting average points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.