रत्नागिरीच्या सुकन्येची हवाई भरारी
By अरुण आडिवरेकर | Published: March 11, 2023 05:54 PM2023-03-11T17:54:17+5:302023-03-11T17:54:32+5:30
रत्नागिरी : येथील ऋतुजा शैलेश मुकादम हिने हवाईसुंदरीच्या अभ्यासक्रमात चांगले गुण प्राप्त करून यश मिळविले. या यशानंतर ती हवाईसुंदरी ...
रत्नागिरी : येथील ऋतुजा शैलेश मुकादम हिने हवाईसुंदरीच्या अभ्यासक्रमात चांगले गुण प्राप्त करून यश मिळविले. या यशानंतर ती हवाईसुंदरी म्हणून सेवा बजावण्यासाठी सज्ज झाली आहे. दिल्लीहून हवाईसुंदरीचे प्रशिक्षण पूर्ण करून ती मुंबईत परतल्यानंतर विमानतळावर तिच्या आई-वडिलांनी तिचे स्वागत केले.
लहानपणापासून हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा हिचे शालेय शिक्षण फाटक हायस्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इंग्लिश मास्टर डिग्री संपादन केली. २०१९ मध्ये कोविडमुळे विमानसेवा ठप्प होती. या काळात ऋतुजाने इंटरनॅशनल सीडेस्कोचा ब्युटिशियनचा कोर्स करून त्यातही यश मिळविले. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करता करताना तिला हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न पडू लागले.
अखेर तिने आजी-आजोबा, आई-वडील यांच्या सहकार्याने इंडिगो एअरलाईन्समध्ये मुलाखत दिली. प्रथम फेरीतच ती उत्तीर्ण झाली. ऋतुजा मुकादम हिच्या यशात आई उमा व वडील शैलेश मुकादम यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्ली येथे हवाईसुंदरीचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन ऋतुजा रत्नागिरीला परतली आहे. येत्या काही दिवसांत ऋतुजा हवाईसुंदरीची सेवा बजावण्यासाठी मुंबईत रुजू होणार आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांची ती नात आहे.