रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे तुडुंब, नद्या, धरणांनी ओलांडली पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:18 PM2019-07-01T14:18:44+5:302019-07-01T14:19:52+5:30
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.
रत्नागिरी : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची संततधार सकाळपासून कायम आहे.ग्रामीण भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे फुल्ल झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील शीळ धरण पाण्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहू लागले आहे.
जिल्ह्यात सरासरी ११२.४४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पर्जन्यवृष्टी राजापूर तालुक्यात झाली आहे. १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मंडणगड तालुक्यात १७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दापोली ६०, खेड ८५, गुहागर १००, चिपळूण १४७, संगमेश्वर ८८, रत्नागिरी ८६, लांजा तालुक्यात ८२ मिलीमीटर मिळून एकूण १०१२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे समुद्राच्या लाटा देखील जोरदार उसळत आहेत. पावसामुळे माती विरघळत असल्याने डोंगरावरील माती कोसळून, रस्त्यावर येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे देखील कोसळली आहेत. पावसामुळे विजेचा सारखा लपंडाव सुरू असतानाच रात्री खंडित झालेला वीज पुरवठा सकाळपर्यंत पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले. शिवाय विजेअभावी पाण्याचे पंप बंद असल्याने ग्रामस्थांनी भर पावसात मात्र गैरसोय झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या देखील दुथडीभरून वाहत आहेत. धरणांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.