रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 12:23 PM2020-08-04T12:23:50+5:302020-08-04T12:26:22+5:30
सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
रत्नागिरी : सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने मार्ग बंद पडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत काजळी नदीचे पाणी भरायला सुरुवात झाली आहे.
काजळी नदीने सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असून, सकाळी १० वाजता पाणीपातळी १७.२४ मीटर होती. धोका पातळी १८ मीटर आहे.
दरम्यान, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, पातळी वेगाने वाढत आहे. भरणे नाका पूल येथे सकाळी ८.३० वाजता पाण्याची पातळी साडेसहा मीटर होती. दहा वाजता ती ७.७५ मीटर एवढी झाली होती. इशारा पातळी सहा मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे.
त्याचबरोबर राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी शहरात घुसू लागले असून, व्यापाऱ्यांनी दुकानातील माल इतरत्र हलविला आहे. चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.