कोकणच्या कन्येने बनविले आत्महत्या राेखणारे उपकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:05 PM2022-02-01T18:05:15+5:302022-02-01T18:13:06+5:30
रिया दीपक लाड या नववीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने बनवले हे यंत्र
वाटूळ : समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असून, आत्महत्या राेखणे हे एक माेठे आव्हान उभे राहिले आहे. या आत्महत्या राेखता आल्या, तर अनेकांचे प्राण वाचू शकतील. हाच उद्देश डाेळ्यांसमाेर ठेवून राजापूर तालुक्यातील रिया लाड या विद्यार्थिनीने ‘एसपी हुक’ नावाचे आत्महत्या राेखणारे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाची राज्यस्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विद्द्यावर्धिनी मुंबई संचलित निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये व इंद्रनील तावडे कला व वाणिज्य महाविद्यालयात रिया दीपक लाड ही नववीच्या वर्गात शिकत आहे. तिने ‘एसपी हुक’ या यंत्राची निर्मिती केली आहे.
‘एसपी हुक’ नामक हे उपकरण सर्वसामान्यांना कुठेही उपयोगी पडणारे व सहज उपलब्ध होणारे आहे. हे यंत्र ६०० रुपये एवढ्या कमी खर्चात बनवले आहे. मोठ्या प्रमाणावर ही यंत्रे बनविल्यास त्याचा खर्च कमीत कमी १५० ते २०० रुपयांवर येऊ शकतो. हे यंत्र वाहतूकविरहित आहे. या यंत्राचा वापर हॉटेल, घर, लॉज, वसतिगृह, महाविद्यालय, शाळा, दुकान अशा ठिकाणी करता येऊ शकताे. या ठिकाणी यंत्राचा वापर केल्यास तिथे होणाऱ्या आत्महत्या रोखता येतील.
हे उपकरण तयार करण्यासाठी तिला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक अरुण कुऱ्हाडे व सहकारी शिक्षकांनी मदत केली. तिच्या या उपकरणाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, उपाध्यक्ष समीर तावडे, सचिव सोनटक्के, राकेश साळवी यांनी तिचे, तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापक अरुण कुराडे यांचे अभिनंदन केले आहे.
कसे काम करते हे उपकरण
sucide preventing hook हे यंत्र जर फॅनवरील आत्महत्या राेखण्यास मदत करते. कमीत कमी पाच किलो वजन वाढल्यास फॅनवरील यंत्र कार्यरत हाेते. यंत्रावरील टेन्शन स्प्रिंगच्या साहाय्याने हे यंत्र नियंत्रित केले आहे. तसेच त्याला वापरलेल्या पुलीला गिअर बसवून तिचे फिरणे मंदगतीने नियंत्रित केलेले आहे. त्यामुळे दोराच्या साहाय्याने खाली येणारा फॅन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात पडू शकत नाही. फॅन अलगद खाली येऊन थांबतो. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.
हे यंत्र तयार करण्यामागे वाढती आत्महत्या कमी करण्याचा उद्देश किवा हेतू आहे, तसेच हे यंत्र खूप लोकांना नवीन जीवनदान, नवीन संधी देऊ शकते. - अरुण कुऱ्हाडे, मुख्याध्यापक