रस्ता नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:05+5:302021-07-07T04:39:05+5:30
चिपळूण : तालुक्यातील खरवते, ओमळी, नारदखेरकी, ताह्मणमळा, गुळवणे व इतर गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेले कित्येक वर्षे खड्डेमय आणि ...
चिपळूण : तालुक्यातील खरवते, ओमळी, नारदखेरकी, ताह्मणमळा, गुळवणे व इतर गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेले कित्येक वर्षे खड्डेमय आणि खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी, रिक्षावाहतूक, मालवाहतूक यांना त्रासदायक होत आहे. रुग्णांना इतरत्र हलविताना अतिशय अडचणीचा सामना करावा लागतो.
लसीकरणाबाबत संभ्रम
दापोली : जिल्ह्यातील नागरिक क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३,४५० लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, परंतु लसीकरण कधी होणार हे अद्याप आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे या लसीकरणाबाबत संभ्रमावस्था आहे.
लावणी खोळंबली
गुहागर : पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने तालुक्यातील काही गावांमध्ये नदी परिसर, तसेच सखल भागातील शेतकऱ्यांनी लावण्या पूर्ण केल्या होत्या, परंतु डोंगर उतारावरील शेतकऱ्यांच्या शेतातील भातलावण्या पावसाअभावी संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता उभी राहिली आहे.
कृषी संजीवनीची सांगता
दापोली : तालुक्यातील असोंड येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाची सांगता नुकतीच करण्यात आली. वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्षारोपणाने ही सांगता करण्यात आली. यावेळी असोंडच्या सरपंच दीप्ती रसाळ, उपसरपंच दीपक देवरुखकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश देवघरकर आदी उपस्थित होते.
बेरोजगारांना मिळणार कामे
रत्नागिरी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २ जुलै रोजी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे मिळत होती. आता या कामांमध्ये वाढ होणार आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट
खेड : तालुक्यातील १५ गाव विभागातील वावे हॉस्पिटल ते मुसाड पेठ या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, परंतु अडीच ते तीन किलोमीटरचा हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. यापैकी एका किलोमीटर रस्त्याचे काम झाले असले, तरी हे निकृष्ट असल्याने हा रस्ताही खराब झाला आहे.
मगरींचा धसका
आवाशी : खेड आणि भोस्ते गावातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यापूर्वीही नागरिकांच्या मनात या मगरींनी दहशत निर्माण केली होती. आता या मगरी पात्राबाहेर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता या मगरींचा धसका घेतला आहे.
साहित्याचे वाटप
खेड : तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतीने गावातील सुमारे दीड हजार कुटुंबांना जीवनावश्यक विविध वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या अनुषंगाने गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. कोरोना काळात आशा स्वयंसेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दलही ग्रामपंचायतीने लोटे पंचक्रोशीतील २५ आशासेविकांचा गौरव केला.
पर्यायी मार्गाची दुरवस्था
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. पिलरचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग बनविण्यात आला आहे, परंतु या मार्गाचीच सध्या दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून, खडीही वाहून गेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत जावे लागते.
रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन, सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्गच पूर्णत: खड्डेमय झाल्याने नागरिकांना त्रासदायक होत आहे. मात्र, या दुरवस्थेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.