नरवण पंधरवणेत बेकायदा वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:30+5:302021-08-27T04:34:30+5:30
गुहागर/असगाेली : तालुक्यातील नरवण पंधरवणे सुतारवाडी येथे अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे सुतारवाडी येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ग्रामस्थांनी ...
गुहागर/असगाेली : तालुक्यातील नरवण पंधरवणे सुतारवाडी येथे अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे सुतारवाडी येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ग्रामस्थांनी यावर विरोधात आक्रमक भूमिका घेऊन याविरोधात तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी समुद्र, खाडी, नदीकिनारी अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. नरवण ग्रामपंचायत क्षेत्रातील पंधरवणे सुतारवाडी स्मशानभूमीच्या परिसरात गेली अनेक वर्षे संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. पंधरवणे स्मशानभूमीकडे जाणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता अवैध वाळू वाहतुकीमुळे खराब झाला आहे. रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्याने जाताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्यांना समज देऊनही राजरोसपणे न जुमानता वाळू वाहतूक सुरू आहे. ही वाळू वाहतूक अनेकवेळा रात्रीची केली जात असल्यामुळे ग्रामस्थ यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या वाळू व्यावसायिकांवर कारवाई करून येथील वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सरपंच यांना दिले आहे.
अनेकवेळा या वाळू उपशाच्या वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जातो. त्यानंतर मात्र पुन्हा वाळू उपसा सुरू होतो. यामागे अर्थकारण असल्यानेच कायमस्वरूपी वाळूचा बंद होत नाही व यातून ग्रामस्थ व वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये संबंध बिघडून याचे रूपांतर हाणामारीमध्ये होऊ शकते व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.