मेर्वी कुडतरकरवाडीतील ग्रामस्थांचा रस्ता अडथळा मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:41 PM2021-01-06T15:41:56+5:302021-01-06T15:43:29+5:30
gram panchayat Ratnagiri Tahshildar- घराकडे, शेतीकडे, जनावरे नेण्यासाठी पूर्वापार रस्त्यावर दगडी बांध घालून अडवणूक केल्याने मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांनी दावा दाखल केला होता. याबाबत वारंवार नोटीस बजावूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने अखेर तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने मार्गातील अडथळे काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा रस्ता मोकळा झाला.
रत्नागिरी : घराकडे, शेतीकडे, जनावरे नेण्यासाठी पूर्वापार रस्त्यावर दगडी बांध घालून अडवणूक केल्याने मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांनी दावा दाखल केला होता. याबाबत वारंवार नोटीस बजावूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने अखेर तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने मार्गातील अडथळे काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा रस्ता मोकळा झाला.
मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांसाठी १२ फुटी रुंद व १६० फूट लांब रस्ता उपलब्ध होता. हा रस्ता याच वाडीतील काहीजणांनी दोन वर्षापूर्वी अडवला होता. रस्त्याच्या बाजूला दगडी बांध घातला आणि फक्त ४ फूट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला होता.
त्यानंतर वाडीतील काही ग्रामस्थांनी तत्कालीन तहसीलदारांसमोर दावा दाखल केला आणि यात दोन्ही पक्षांची मते, म्हणणे व पुरावे घेऊन तत्कालीन तहसीलदार यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये या दाव्याचा निकाल देऊन रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करून संबंधितांनी तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगिती घेतली होती. वरिष्ठ न्यायालयाने सुध्दा या प्रकरणाचा ऑक्टोबर २०१९ मध्ये न्यायनिर्णय देऊन अपील फेटाळले आणि त्याचबरोबर स्थगितीही उठविली होती. त्यानंतर संबंधितांना नोटीस देऊन अडथळा काढून टाकण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र, तरीही रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता.
त्यामुळे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी अंतिम नोटीस देऊन अडथळा काढून टाकण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली, तथापि त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने पावस येथील मंडल अधिकारी यांना अडथळा काढून टाकून रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार जाधव यांनी आदेश दिले. त्यानंतर ४ जानेवारी रोजी मेर्वी कुडतरकरवाडी येथील रस्त्यावरील अडथळा जेसीबीच्या मदतीने काढून टाकून रस्ता खुला करून देण्यात आला. त्यामुळे दोन वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
सर्व खर्च वसूल करणार
अडथळा शासकीय खर्चाने दूर करण्यासाठी जो खर्च आला आहे. त्याची सक्तीने वसुली जागा अडवणूक करणाऱ्या संबंधितांकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली. कोणीही कोणाचाही शेतावर जाणारा पूर्वापार वापराचा रस्ता किंवा पाणंद अडवू किंवा अडथळा आणू नये. जेणेकरुन अशा प्रकारे कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहनही शशिकांत जाधव यांनी केले आहे.