तब्बल ७० वर्षांनी माचाळ गावात पाेहाेचला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:18 AM2021-03-30T04:18:13+5:302021-03-30T04:18:13+5:30
लांजा तालुक्यातील माचाळ येथे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : ...
लांजा तालुक्यातील माचाळ येथे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : स्वातंत्र्यानंतरही दुर्लक्षित राहिलेल्या तालुक्यातील माचाळ गावात रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. गावात रस्ता येण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार विनायक राऊत यांनी गावाला भेट देताच ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फुटाच्या उंचीवर
असलेले माचाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. माचाळ हे डोंगराळ
भागात असल्याने येथील रस्ता हाेण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी लागला आहे. येथील
ग्रामस्थ गेली ७० वर्षे डोंगरामधून असलेल्या निमुळत्या पायवाटेने माचाळ ते कोचरी, माचाळ ते साखरपा असे पायपीट करीत होते. माचाळ येथे ४५० लोकवस्ती असलेल्या गावामध्ये रेशन दुकान, दवाखाना याच्यासाठीसुध्दा डोंगर उतरुन यावे लागत होते.
गेली तीन ते चार
वर्षे माचाळ गावामध्ये रस्त्याचे काम सुरु होते. मोठ्या प्रमाणात डोंगर
असल्याने येथे काम करणे जिकरीचे होते. यावर मात करत माचाळ ग्रामस्थांनी
रस्त्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याने त्यांचा आनंद गगनात
मावेनासा झाला आहे. कच्चा रस्ता असला तरी आज ना उद्या डांबरी रस्ता आपल्या
गावात होऊन लवकरच एस. टी. महामंडळाची ‘लालपरी’ त्यांच्या दृष्टीपथास पडणार आहे.
माचाळ येथील
ग्रामस्थांनी आपली व्यथा खासदार विनायक राऊत यांच्यासमाेर मांडली हाेती. खासदार विनायक राऊत यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. निधी उपलब्ध होताच डोंगराचे कटिंग करुन खिंडीतून रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी माचाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. ७० वर्षांनी रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने येथील ग्रामस्थ आनंदीत आहेत.
खासदार विनायक राऊत यांनी माचाळ गावाला भेट दिली असता येथील
ग्रामस्थांनी ढाेलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या
कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक,
उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, माचाळ पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.