तिडे धरणामुळे परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते, पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:22+5:302021-07-20T04:22:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीमुळे सर्व यंत्रणाच जागी झाली असली तरी, तालुक्यातील धरणे आणि त्यापासूनचे ...

Roads, bridges under water due to floods in the area due to Tide dam | तिडे धरणामुळे परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते, पूल पाण्याखाली

तिडे धरणामुळे परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते, पूल पाण्याखाली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीमुळे सर्व यंत्रणाच जागी झाली असली तरी, तालुक्यातील धरणे आणि त्यापासूनचे फायदे व तोटे याचा आता तरी विचार होण्याची गरज आहे. सिंचन क्षेत्र वाढावे, पाणीप्रश्न मिटावा याकरिता निर्माण करण्यात आलेल्या धरणांचा मूळ उद्देशच, निधीची कमतरता, मागणी आणि पाठपुराव्याचा अभाव यामुळे बाजूला पडत आहे. हे वास्तव असले तरी, सध्या तिडे धरणामुळे परिसरातील ग्रामस्थांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटत आहे.

तिडे धरणाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले असून, सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यामधून आणि दरवाजामधून पाण्याचा विसर्ग शनिवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर याच परिसरातील भोळवली धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तिडे जि. प. गटामध्ये भोळवली व तिडे अशी दोन धरणे आहेत. या धरणाचा विसर्ग भारजा नदीपात्रात होतो. मात्र यामुळे परिसरातील पालघर, तिडे, टाकेडे परिसरातील मुख्य रस्त्यावर व पुलावरून पाणी जाण्याचे प्रकार घडलेला नव्हता. मात्र तिडे धरण पूर्णपणे भरल्यामुळे या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भारजा नदीपात्रात पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच नाही, तर नेहमीच्या पावसामध्येही पाणी रस्त्यावरून जाण्याचे प्रकार वाढत आहेत.

धरण निर्मितीनंतर आता येथील पूल आणि रस्त्यांची उंची कमी पडू लागली आहे. त्यामुळे आता ही उंची वाढवण्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आजवर प्रशासन वा स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात ही बाब आली नव्हती. मात्र यावर्षीपासून धरणातून विसर्ग सुरू झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत तिडे धरणामधून पाण्याचा विसर्ग होत आहे. पाऊस सततचा पडत असल्याने तिडे धरणात पाणी जमा होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्गही वाढणार आहे. त्यासाठी पुलाची आणि रस्त्याची उंची वाढवणे गरजेचे बनले आहे.

तिडे धरणाची स्थिती...

धरण लाभक्षेत्र/सिंचन क्षेत्र प्रस्तावित ५२२ हेक्टर/८७६ हेक्टर

धरण क्षमता ७.५०७ द.ल.घ.मी. (दशलक्ष घनमीटर)

सांडवा लांबी ५०/३ मीटर

पूर्ण संचय पातळी ११७ मीटर

महत्तम विसर्ग सांडव्यावरून ४०८.१० घनमीटर प्रति सेकंद

भोळवली धरणाची स्थिती...

धरण लाभक्षेत्र/सिंचन क्षेत्र प्रस्तावित ३३०/४४० हेक्टर प्रस्तावित आहे.

धरण क्षमता ३.७४१ द.ल.घ.मी. (दशलक्ष घनमीटर)

सांडवा लांबी २५/३ मीटर

पूर्ण संचय पातळी १२६.३ मीटर. प्रस्तावित १३१.५० मीटर

महत्तम विसर्ग सांडव्यावरुन १४.१३ घनमीटर प्रति सेकंद

कालवा सद्यस्थिती ८० टक्केे पूर्ण

सद्यस्थितीत धरण पूर्ण १२६.७ मी. पातळी पूर्ण भरलेले आहे. यामुळे ०.४० ने पाणी वाहत आहे.

Web Title: Roads, bridges under water due to floods in the area due to Tide dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.