Ratnagiri: पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर, परशुराम घाटातील वाहतूक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा
By संदीप बांद्रे | Published: May 9, 2023 11:49 AM2023-05-09T11:49:22+5:302023-05-09T11:49:52+5:30
मार्गावरील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच वळीव पावसाने हजेरी लावली. यामुळे परशुराम घाटात भरावाची माती महामार्गावर आल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.
महामार्गावरील परशुराम घाटात सध्या दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, काल रात्रीपासून चिपळूण तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भरावातील माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा रस्ता पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पहाटे पाच वाजल्यापासून परशुराम घाट आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतूक जाम झाली आहे. खेड आणि चिपळूण दोन्ही दिशेला मुंबई - गोवा महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
बसेस, ट्रक चिखलात अडकली
घाटात मातीमुळे निर्माण झालेल्या चिखल हटवण्यासाठी पुढील काही तास लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माती महामार्गावर आल्यामुळे बसेस तसेच ट्रक घाटामध्ये या चिखलात अडकली आहेत. या मार्गावरील वाहतूक चिरणीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.