चिपळुणातील राधाकृष्ण नगरमधील कामे लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:28+5:302021-03-21T04:29:28+5:30
अडरे : येथील राधाकृष्ण नगरमधील खोळंबलेल्या रस्ता आणि गटाराचे काम लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे ...
अडरे : येथील राधाकृष्ण नगरमधील खोळंबलेल्या रस्ता आणि गटाराचे काम लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
फेब्रुवारीमधील सर्वसाधरण सभेत चिपळूण शहरातील ३७ विकास कामांना मुदत वाढ देण्यात आली, परंतु या ३७ कामांच्या मुदतवाढ ठरावावर नगराध्यक्षांनी सही करण्यास विलंब केला आणि त्यामुळे कामे थांबली असा आरोप महाविकास आघाडीने केला होता. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण नगरमधील नागरिक आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नगरपरिषदमध्ये धडकले. राधाकृष्णनगरमधील विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्यानंतर, आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी मुदतवाढ ठरावावर सही केव्हा करणार, असा प्रश्न करताच, त्यांनी शनिवारी काम सुरू होणार असे स्पष्ट केले.
यावेळी सुनील चव्हाण, विनय चितळे, विलास खोत, रमेश आवले, गजानन पडावे, संजय घोलेकार यांनी विविध समस्या मांडल्या. या बैठकीच्या वेळी गजानन पडावे, रमेश आवले, बाबू चव्हाण, वामन उतेकर उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या दालनात नगरसेवक आशिष खातू आणि नगरसेविका वर्षा जागुष्टे उपस्थित होत्या. यानंतर नगरसेवक करामत मिठागरी यांच्या नेतृत्वाखाली मिठागरी मोहल्लामधील नागरिकांनीही नगराध्यक्षांची भेट घेऊन रस्त्याची कामे लवकर सुरू करा, अशी विनंती केली.