देवरुखात पिस्तुलाचा धाक दाखवून घरावर दरोडा, पाच लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 05:44 PM2021-07-09T17:44:35+5:302021-07-09T17:46:59+5:30
Crimenews Ratnagiri Police : घरावर दरोडा टाकून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात घडली.
देवरुख : घरावर दरोडा टाकून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात घडली.
दरोडेखोरांनी नुरल होदा मशहुर अली सिद्दिकी यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करुन पलायन केले. दरोड्याच्या या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार नुरल सिद्दिकी यांचा देवरुख नजीकच्या कांजीवरा येथे भंगार व्यवसाय असून, तेथेच ते वास्तव्याला असतात. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तिंनी नुरुल यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.
नुरुल यांना चाहूल लागताच चारही दरोडेखोरांनी नुरुल यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नुरुल यांच्यासह त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून बेडरुममध्ये प्रवेश केला. स्क्रू ड्रायव्हरने लोखंडी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदी सुमारे ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा माल चोरुन नेला.
नुरुल सिद्दिकी यांचा भाचा असादउल्ला याच्या तोंडाला दरोडेखोरांनी चिकटपट्टी लावली आणि सर्वांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आणि दरोडेखोरांजवळ पिस्तूल असल्यामुळे सिद्दिकी कुटुंब घाबरून गेले होते. तोंडाला कपडा बांधलेला असल्यामुळे दरोडेखोरांचे चेहरे नुरुल यांना नीट दिसले नाहीत.
दरोडेखोरांनी पाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा करताना नुरुल यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटींची खंडणी देण्याची मागणी केली आहे. या घटनेने घाबरलेल्या नुरुल सिद्दिकी यांनी सकाळ होताच देवरुख पोलीस स्थानक गाठले आणि दरोड्याबाबत देवरुख पोलिसांना माहिती दिली. देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
नुरुल सिद्दिकी यांच्याकडून पोलिसांनी दरोडेखोरांचे वर्णन, त्यांची भाषा, उंची आदी माहिती घेतली आहे. श्वान पथकानेही घटनास्थळी येऊन माग काढला. मात्र, दरोडेखोर वाहनातून आले असल्याने अधिक माग काढणे शक्य झाले नाही.
या दरोड्याच्या तपासासाठी ठसे तज्ञही दाखल झाले होते. या दरोड्याच्या अत्यंत बारकाईने आणि वेगाने तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. दरम्यान, या दरोड्याच्या प्रकारानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आहे.