नाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 04:22 PM2021-01-28T16:22:39+5:302021-01-28T16:27:00+5:30
sunil tatkare Ratnagiri- रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती सभेसाठी रत्नागिरीत आले असताना खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड काळात भारत सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
निसर्ग वादळामुळे झालेल्या वित्त हानीत महाविकास आघाडी सरकारने आर्थिक मदत दिली. पायाभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिला. सागरी महामार्गासाठी निधी मंजूर असून, ग्रीनफिल्ड महामार्गासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे ते म्हणाले.
हर्णै, श्रीवर्धन, आगरदंडा येथील बंदर विकासासाठी ६५० कोटींचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सागरी जल वाहतूक वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीने जेटी बांधण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे गेले ६० दिवस शांततेत आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या प्रकाराचे समथन करत नाही, परंतु, पोलिसांनी सत्य शोधून आंदोलनाबाबत गांभीर्य बाळगावे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, मात्र तीनही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापसात समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले.