शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका राजकीय स्वार्थासाठी, भाजप तालुका उपाध्यक्षांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 02:22 PM2021-12-24T14:22:04+5:302021-12-24T14:23:01+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे.
राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे.
मात्र, ज्या पाच गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त जनतेने मोबदला स्वीकारला आहे. त्या जनतेला प्रकल्प हवा आहे व यातून त्यांनी प्रकल्पाला संमती दिल्याचेच पुढे आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध हा राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मत भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजा काजवे यांनी व्यक्त केले.
प्रस्तावित जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलनाच्या लढ्यात कायमच अग्रभागी असलेले व तुरुंगवास भोगलेल्या राजा काजवे यांनी विकासाच्या मुद्यावर जैतापूर अणुऊर्जा व रिफायनरीचे समर्थन करत शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या या प्रकल्पविरोधी बेगडी भूमिकेवर तोफ डागली आहे.
हा प्रकल्प नको म्हणून आम्हीही प्राणपणाने लढा दिला. मात्र, तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना वाढीव साडेबावीस लाखाची मदत जाहीर केली आणि मग प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला स्वीकारण्यासाठी शासनदरबारी रांगा लागल्या. यात अगदी त्या-त्या गावातील शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारीही पुढे होते.
आजपर्यंत प्रशासनाकडून प्राप्त माहितीप्रमाणे सुमारे ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी मोबदला स्वीकारला आहे. त्यामुळे एक प्रकारे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाला संमतीच दिली आहे, असे काजवे म्हणाले. त्यामुळे आम्ही जनतेसोबत, स्थानिकांचा विरोध ही नौटंकी आता शिवसेनने बंद करावी असा टोला काजवे यांनी गावला आहे.
स्थानिकांची दिशाभूल
आपणही यापूर्वी प्रकल्पाच्या विरोधाच्या भूमिकेत होतो, मात्र आम्ही जीव तोडून विरोध करायचा आणि शिवसेनेच्या लोकांनी मदत घ्यायची. शिवसेननेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांनी प्रकल्प विरोधी भूमिका घ्यायची पण स्थानिक जनतेला ना रोजगार ना उत्पन्न वाढीचा मार्ग आणि ना त्यासाठी प्रयत्न मग हे कशासाठी असा प्रश्न काजवे यांनी उपस्थित केला. केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेनेने स्थानिक सामान्य जनतेची दिशाभूल करत प्रकल्पांना विरोध करून घोर फसवणूक केल्याचा आरोप काजवे यांनी केला आहे.