सूर्यकांत दळवींची भूमिका ‘वेट अँड वॉच’

By admin | Published: October 2, 2016 11:22 PM2016-10-02T23:22:01+5:302016-10-02T23:22:01+5:30

पत्रकार परिषदेत उलगडले मन : मी नको असेन; तर विचार करावा लागेल

Role of Suryakant Dalvi, 'Wet & Watch' | सूर्यकांत दळवींची भूमिका ‘वेट अँड वॉच’

सूर्यकांत दळवींची भूमिका ‘वेट अँड वॉच’

Next

दापोली :मला एकाच चुलीवर संसार करायचा आहे, परंतु तुम्हाला मी नको असेन, तर योग्यवेळी नक्की विचार करेन, अशा शब्दांत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी परखडपणे मत मांडत पक्षाच्या भूमिकेवर आपली दिशा ठरणार असून, सध्या तरी आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, असा खुलासा पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला नाही. त्यामुळे लोकमतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु आताच पक्षबदलाच्या भूमिकेवर बोलणे उचित ठरणार नाही. कार्यकर्त्यांशी विचारविनिमय व चर्चा करून योग्यवेळी भविष्यातील दिशा ठरवली जाईल, असेही दळवी म्हणाले.
रविवारी दळवी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच दळवी यांनी पत्रकार परिषद बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दळवी म्हणाले, मी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कदाचित ही विरोधकांनी उठवलेली बोंब असू शकते. परंतु पक्षाला आपली गरज वाटत नसेल तर योग्यवेळी भूमिका स्पष्ट करावी लागेल. केवळ भावनेवर राजकारण करून चालणार नाही. कोणत्याही कार्यकर्त्याची चूल पक्षावर पेटत नाही. समाजसेवक म्हणून आजपर्यंत अनेकजण काम करीत आहोत.
विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर ज्या लोकांनी पक्षविरोधात काम केले, त्यांना बक्षीस म्हणून पक्षात महत्त्वाची पदे मिळत असतील तर निष्ठावंत कार्यकर्ते कुठे जाणार? ज्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले. गेली दोन वर्षे जे लोक पक्षाच्या बाहेर आहेत, त्यांना आधी पक्षात घ्या. त्यांना जाब विचारा, मगच कार्यकारिणीला विश्वासात घेऊन लोकशाही पद्धतीने पक्षाचे पद द्यावे, ही आमची मागणी आहे. असे न करता थेट मातोश्रीवरून एखाद्याची तालुकाप्रमुख किंवा उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
तिघांची दिलजमाई असती तर?
रामदास कदम-अनंत गीते यांची दिलजमाई झाली, याचा आपल्याला आनंद आहे. पण, आपल्याला याची कल्पना दिली असती तर तिघांची दिलजमाई पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरली असती. परंतु या दिलजमाईची आपल्याला कल्पनाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या दिलजमाईत काय ठरले ते आपल्याला माहीत नाही. त्यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याची बातमी आपण पेपरमध्ये वाचली.

Web Title: Role of Suryakant Dalvi, 'Wet & Watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.