हर्णै किल्ल्यावर रोप-वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 09:45 PM2016-05-17T21:45:23+5:302016-05-18T00:32:06+5:30
अशी महत्त्वपूर्ण घोषणा भांडूपचे आमदार व दापोली - उटंबरचे सुपुत्र अशोक पाटील यांनी तालुक्यातील उटंबर येथे केली.
दापोली : दापोली तालुक्यातील पर्यटन वाढावे, याकरिता हर्णै येथील जलदुर्गात जाण्याकरिता येत्या वर्षभरात रोप-वे बांधण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भांडूपचे आमदार व दापोली - उटंबरचे सुपुत्र अशोक पाटील यांनी तालुक्यातील उटंबर येथे केली. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पहिला रोप-वे होण्याचा मान लवकरच दापोली तालुक्याला मिळणार आहे.
उटंबर येथील शिवाजी महाराजांचे महान गुरू याकुबबाबा यांच्या उर्सनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यटकाची एक गाडी तालुक्यात आली की, ती किमान ५ हजार रुपये तालुक्याला देऊन जाते. मात्र, पर्यटकांची होणारी गैरसोय, तालुक्यातील खराब रस्ते यामुळे पर्यटक येथे पुन्हा येण्यास नाखूश असतात. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनेक योजना आपण आखल्या आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून हर्णैमधील पाण्याच्या किल्ल्यात जाण्याकरिता आपण जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या रोप-वेची मागणी केली आहे. शिवाय आपण नुसती मागणी करून थांबलो नाही तर या रोप-वेचा प्रस्ताव अर्थसंकल्प समितीकडे सादर केला आहे. येत्या अधिवेशनात या कामाला मंजुरी मिळेल व वर्षभरात हर्णै येथे रोप-वे अस्तित्त्वात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य मुजीब रूमाणे यांनी दापोली अर्बन बँक याकुबबाबा दर्गा भाविकांकरिता थंड पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. तसेच एका महिनाभरात याकुबबाबा यांची इत्यंभूत माहिती असणारी वेबसाईट अस्तित्त्वात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज नदाफ यांनी याकुबबाबांच्या उर्सवर जेवढा खर्च होतो, या खर्चाच्या २५ टक्के रक्कम त्यांचा इतिहास लिहिण्यावर खर्च व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त
केली.
तसेच याकुबबाबा हे मुस्लिम असल्याने त्यांना शिवाजी महाराजांच्या गुरूंमध्ये शेवटचा नंबर दिला जातो, असे सांगून याकुबबाबा व शिवाजी महाराज यांचे गुरू - शिष्याचे नाते जगभर पोहोचवणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे रऊफ हजवाने व दामोदर कुलाबकर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर मकबूल दिनवारे, वसीम परकार, निसार महालदार, कलंदर शेखनाग, सुरेंद्र कर्देकर, जावेद मणियार, वृषाली कुलाबकर, सादीक शेख, रहेमान बोरकर, जावीर पावसकर, जहूर झोंबडकर, मज्जीद चोगले, अलिमियाँ गंगरेकर, शशिकांत राऊत, वामन सावंत-पाटील, आकांक्षा कुलाबकर, अनंत कोळी, धर्मा कोळी, फय्याज मुजावर, ताबीज सोलकर, झहूर कुलाबकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)