उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच...!
By admin | Published: April 12, 2016 01:03 AM2016-04-12T01:03:07+5:302016-04-12T01:03:23+5:30
रत्नागिरी नगरपरिषद : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. नगरसेवक बनून इतरांप्रमाणे झगमगत्या दुनियेत प्रवेश करता येईल, अशी आस लावून अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पक्षाकडून आपलीच वर्णी कशी लागेल, यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या राजकीय पतंगांचा मांजा कापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
नगरपरिषदेच्या नोव्हेंबरमधील निवडणुकीसाठी झालेल्या या राजकीय गर्दीत कोणत्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार व किती विद्यमान नगरसेवकांचे पत्ते गुल होणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तिकीट न मिळाल्यास अनेकांनी आतापासूनच अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी नवख्या कार्यकर्त्यांमध्ये पदरमोड करून विकासकामे करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांकडून त्याच जागेवर पुन्हा तिकीट मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. या राजकीय स्पर्धेत आता शहरातील प्रत्येक पक्षाचे अनेक कार्यकर्ते उतरले आहेत. नगरपरिषद निवडणूक वॉर्डनुसार झाली तर ३० वॉर्डमध्ये प्रत्येक पक्षाचे ३० उमेदवार असतील. सेना - भाजपमध्ये काडीमोड झाल्याने ते स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे ६० उमेदवार रिंगणात राहणार आहेत. राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेही ३० उमेदवार रिंगणात येतील. भाजप - राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. तरीही इच्छुकांची गर्दी मोठी असल्याने त्यामुळे होणारी बंडखोरी शमविताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेत सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे आहेत. शिवसेनेने स्वबळाचा नारा याआधीच दिला आहे. त्यामुळे सेनेमार्फत विद्यमान १५ नगरसेवक हे पुन्हा उमेदवारीसाठी आग्रही आहेतच. त्यातील काही जणांची तिकिटे यावेळी कापली जाण्याची शक्यता आहे. तसेच कार्यकर्त्यांची फौज अधिक असल्याने व सेनेत जुना नवा वाद असल्याने त्यातूनही उमेदवारी वाटपावरून राग-रुसवे वाढण्याची शक्यता आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास इतर पक्षातून संधी मिळेल काय, याचीही चाचपणी अनेक कार्यकर्ते करीत आहेत. (प्रतिनिधी)