रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदावर रोशन फाळके, विषय समिती सभापती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:47 PM2020-01-02T15:47:53+5:302020-01-02T15:49:12+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर रोशन फाळके यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. तसेच विषय समिती सभापतींची निवडही बिनविरोध ...
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर रोशन फाळके यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. तसेच विषय समिती सभापतींची निवडही बिनविरोध झाली. सर्वच विषय समिती सभापतीपदांवर शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड झाली. विरोधात कोणीही अर्ज भरला नाही.
रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदांवर कोणाला संधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांबरोबर अटीतटीची निवडणूक झाली. त्यात शिवसेनेचे बंड्या साळवी यांनी बाजी मारली.
मात्र, यावेळी कोणत्या प्रभागात शिवसेनेला किती मतदान झाले, यावरून सभापतीपद कोणाला द्यायचे हे ठरविले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र, ज्यांची नावे चर्चेत होती त्यांना सभापतीपदे मिळाली आहेत.
विषय समिती सभापतीपद आणि समिती सदस्य निवडणुकीची प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी आरोग्य सभापती म्हणून राजन शेट्ये, बांधकाम सभापती म्हणून रशिदा गोदड, नियोजन सभापती म्हणून सुहेल मुकादम, महिला बालकल्याण सभापती म्हणून कौसल्या शेट्ये व पाणी सभापती म्हणून विकास पाटील यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. त्यांच्या विरोधात अन्य कोणाचेच अर्ज न आल्याने या सर्वांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.