वाढीव बिलांवरून दोन गटनेत्यांचे घुमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:15+5:302021-06-24T04:22:15+5:30
चिपळूण : नगर परिषदेतील वाढीव बिलांवरून शहरातील महाविकास आघाडीतील धुसफूस अजूनही सुरूच आहे. याआधी वाढीव बिले देण्यास संमती देणारे ...
चिपळूण : नगर परिषदेतील वाढीव बिलांवरून शहरातील महाविकास आघाडीतील धुसफूस अजूनही सुरूच आहे. याआधी वाढीव बिले देण्यास संमती देणारे नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे आणि राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर यांनी कोणत्याही परिस्थितीत वाढीव बिले देऊ नयेत, असे नवे पत्र मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना दिले आहे.
येथील नगर परिषदेत निविदेशिवाय झालेल्या वाढीव दराच्या कामांची तब्बल १ कोटी २८ लाख रुपयांची बिले अदा करण्यावरून गदारोळ सुरूच आहे. अशातच महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गटनेत्यांनी स्वतःच्या पक्षनेत्यांना आणि नगरसेवकांना अंधारात ठेवून परस्पर बिले देण्यास संमती दिल्याने आघाडीत धुसफूस सुरू आहे.
याविषयी महाविकास आघाडीची नुकतीच महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत तीनही पक्षांच्या गटनेत्यांना खडेबोल सुनावले होते. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ अनुपस्थित होते. मात्र, उर्वरित गटनेत्यांनी वाढीव बिले देण्याबाबतचे पत्र आपण नजरचुकीने दिल्याचे कबूल केले. या बैठकीनंतर काँग्रेसचे सुधीर शिंदे, तर राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर यांनी तडकाफडकी प्रशासनाला पत्र देत कोणतीही वाढीव बिले देऊ नयेत, असे नमूद केले आहे. तसेच वाढीव बिले दिल्यास नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्याला प्रशासनच जबाबदार राहील, असे नमूद करत घुमजाव केले आहे.
याप्रश्नी अजूनही शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली नाही.
गटनेत्यांकडून परस्पर झालेल्या या प्रकाराविषयी नगरसेविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित नगरसेविकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यावेळीही शिवसेनेच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेविकांना निरोप पाठवून मुख्याधिकाऱ्यांना कोणीही भेटणार नाही, असे कळविले. शिवसेनेत 'गटनेत्यांचा आदेश अंतिम' असल्याने संबंधित नगरसेविकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट टाळली. परंतु अजूनही या विषयीची धुसफूस महाविकास आघाडीत सुरूच आहे.