भोकेतील पोस्टात २८ लाखांचा अपहार
By admin | Published: June 9, 2016 11:53 PM2016-06-09T23:53:52+5:302016-06-10T00:14:09+5:30
१६४ खातेदारांनी त्याच्याकडे पोस्टात भरण्यासाठी सुमारे २८ लाख ३९ हजार ३९३ इतकी रक्कम दिली होती
रत्नागिरी : तालुक्यातील भोके पोस्टातील १६४ खातेदारांची २८ लाख ३९ हजार ३९३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या डाकपालला अटक करण्यात आली. विनायक गोपाळ साळवी असे त्याचे नाव असून, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.टपाल खात्यातील वरिष्ठ अधिकारी विनायक नारायण कुलकर्णी (वय ४४, पोस्टल कॉलनी, रत्नागिरी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. विनायक साळवी (साईभूमीनगर, रत्नागिरी) हा भोके येथील शाखा डाकपाल कार्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत होता. ६ जुलै २0१५ ते ४ जानेवारी २०१६ या कालावधीत गावातील खातेदार विजया रमेश पवार यांच्यासह १६४ खातेदारांनी त्याच्याकडे पोस्टात भरण्यासाठी सुमारे २८ लाख ३९ हजार ३९३ इतकी रक्कम दिली होती. साळवी याने ही रक्कम घेतली आणि त्याची नोंद पुस्तकात करून दिली. मात्र, ही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही.
पुस्तकामध्ये नोंद असलेली रक्कम खात्यावर जमा झालेली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच पोस्टाच्या खातेदारांनी टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानुसार विनायक कुलकर्णी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात साळवी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. साळवी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विनायक साळवी याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (वार्ताहर)