आरटीओ कोटा परवाना पध्दत त्रासाची
By admin | Published: November 3, 2014 09:51 PM2014-11-03T21:51:58+5:302014-11-03T23:25:28+5:30
एका शिबिरात शंभरच परवाने : ग्रामीण भागातील नवशिक्या लोकांची परवड कायम
शिरगाव : चिपळूण येथे महिन्यातून चारवेळा होणाऱ्या आरटीओ कॅम्पमध्ये नवशिक्यांना परवाना देण्याची कोटा पद्धत असंख्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक सोमवारी होणाऱ्या कॅम्पमध्ये केवळ १०० परवाने देण्याच्या शासन निर्णयामुळे झालेल्या त्रासाबद्दल आज अनेकांनी संताप व्यक्त केला. अलीकडे एकाच कुटुंबात चार वाहने वापरण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकींच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.
साहजिकच शासन नियमाप्रमाणे प्रथम सहा महिन्यांसाठी शिकाऊ परवाना घेण्यासाठीची गर्दी वाढल्यानंतर अधिकारीवर्ग वाढवण्यापेक्षा ठराविक परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. दापोलीत महिन्यातून एकदाच कॅम्प होत असल्याने सर्व उर्वरित गावातील वाहने व परवाने याबाबतचे सर्व व्यवहार चिपळुणातच होत असतात.
प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांच्या कारवाईला घाबरुन नवीन वाहनधारकांनी शिकाऊ परवाना काढण्यासाठी १०० मध्ये राहण्यासाठी सकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर हजर राहून अधिकाऱ्यांची त्यांनी तीन तास वाट पाहिली. इतक्या सकाळी नंबर लावणे केवळ चिपळूण शहर परिसरातील व्यक्तिनाच शक्य असते. ग्रामीण भागातून दहा वाजता चिपळूण येथे पोहोचलेल्या वाहनधारकांना वारंवार परत जावे लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. मुळातच चिपळूणला आरटीओ कॅम्प घेण्याचा मूळ उद्देश कोणत्याच अर्थाने सफल होत नाही, असे मत त्रस्त वाहनधारकांनी मांडले.
चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील अनेकांनी कोटा पद्धतीबाबत नाराजी दर्शवली असून, हजर राहिलेल्या सर्वांना शिकाऊ परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चिपळूणप्रमाणेच दापोली येथे आरटीओने महिन्यातून केवळ एक कॅम्प न घेता त्याची संख्या वाढविल्यास त्याचा फायदा नविन परवानाधारकांना होईल व त्यातून कारभाराबाबत ्अधिक पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)