राजापुरात पावसाचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:11+5:302021-07-23T04:20:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने पुराच्या पाण्याचे राजापूर शहरात शिरले आहे. पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सततच्या पुराचा सर्वाधिक फटका शहर बाजारपेठेला बसला आहे. या हंगामात तब्बल सहा वेळा पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारी पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला. पुराच्या पाण्याने यावेळी जवाहर चौक मार्गे कुशे मेडिकल, नवाळे कॉम्प्लेक्सपर्यंत, तर बाजारपेठेत अभ्यंकर ग्राहक बाजार व मुन्शीनाका मार्गे उर्दू शाळेपर्यंत धडक मारली, तर मालपेकर रोड पाण्याखाली गेला आहे. मात्र, नगरपरिषदेने पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने सर्वांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारपेठेत पाणी शिरल्याने बहुतांशी दुकाने बंद राहिली आहेत.
शहरातील शिवाजीपथ, चिंचबांध, बंदधक्का, वरचीपेठ, कोंढेतड, आंबेवाडी, गुजराळी परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, तर वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगण पाण्याखाली गेले आहे, तर शहर बाजारपेठेला जोडणारा कोंढेतड पूल, कै. वैशंपायन गुरुजी पूल, जवाहरचौक नजीकचा नैनेसाहेब पूल, भटाळी येथील कै. वासुकाका जोशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागाचा शहर बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राजापूर-शीळ मार्गे चिखलगाव रस्ता गेले बारा दिवस पाण्याखाली गेला आहे.
तालुक्यातील परटवली-ओशिवळे ताम्हाणे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच कशेळी येथील गणपत राड्ये यांचा गोठा कोसळून नुकसान झाले आहे, तर हर्डी-रानतळे रस्ता पुन्हा खचला आहे. महाळुंगे बौद्धवाडी येथे बुद्धविहारावर झाड पडून नुकसान झाले आहे. परटवली ग्रामपंचायत इमारतीमध्ये, तसेच सलाम बलबले यांच्या घरामध्ये अर्जुनाच्या पुराचे पाणी शिरले आहे.
राजापूर शहरात गुरुवारी सकाळी पुराचे पाणी शिरताच तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पाहणी केली.
-----------------------------------------
वीज पुरवठा विस्कळीत
गेले बारा दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी भर पावसातही जिवाची बाजी लावून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेक भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडून वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे.