स्फोटके सापडल्याच्या अफवेने रत्नागिरीत उडाली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 06:04 PM2020-12-28T18:04:47+5:302020-12-28T18:05:50+5:30
Crimenews Ratnagiri police- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन रत्नदुर्ग (डमी डिकॉय) ही मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनअंतर्गत भाट्ये येथे बनावट दहशतवादी व स्फोटके पकडल्यावर अवघ्या काही तासातच शहरात स्फोटके सापडल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे प्रात्यक्षिक असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
रत्नागिरी : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन रत्नदुर्ग (डमी डिकॉय) ही मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनअंतर्गत भाट्ये येथे बनावट दहशतवादी व स्फोटके पकडल्यावर अवघ्या काही तासातच शहरात स्फोटके सापडल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे प्रात्यक्षिक असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेसाठी रेड फोर्स (शस्त्र पक्ष) व ब्ल्यू फोर्स अशी दोन पथके तयार केली होती. रेड फोर्सकडून जिल्ह्यातील मर्मस्थळे, गर्दीची ठिकाणे, चेकपोस्ट तयार केली होती. रेड फोर्स म्हणून २ वाहने, ६ बनावट दहशतवादी याचा वापर करण्यात आला.
या दहशतवाद्यांकडून बनावट स्फोटक पदार्थ वाहनातून वाहतूक करुन जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी वाहून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ब्ल्यू फोर्स म्हणून ३५ पोलीस अधिकारी व २३२ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड, २७ सुरक्षा वॉर्ड इत्यादी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाट्ये चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील बनावट दहशतावाद्यांनी बनावट स्फोटक पदार्थ वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे बनावट दहशतवादी यांना वाहनासह पकडण्यात आले. त्यांच्याकडे संशयित वस्तू आढळल्याने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून राखीव फोर्स, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशामक दल यांना पाचारण करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली होती.
बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून संशयित वस्तूंची तपासणी करण्यात आली. त्यानंतर चेकपोस्टवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याच प्रकारे गुहागर पोलीस स्थानक हद्दीतील आबलोली चेकपोस्ट व जयगड पोलीस स्थानक हद्दीतील खंडाळा येथेही सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यात आली. मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी कामकाज पाहिले.