दहावी, बारावी निकालाच्या तारखाबांबत सोशल मिडियावर अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:16 PM2019-05-27T15:16:45+5:302019-05-27T15:19:05+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांच्या अफवा जाहीर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रमावस्था पसरली आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचा खुलासा बोर्डातर्फे करण्यात आला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांच्या अफवा जाहीर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रमावस्था पसरली आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचा खुलासा बोर्डातर्फे करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर होणार असल्याबाबतचे संदेश सोशल मिडियावर फिरत आहेत. बारावीचा निकाल दि.२७ मे तर दहावीचा निकाल दि.६ जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे संदेश केवळ अफवा असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
वास्तविक राज्यभरातून दहावी, बारावीसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाच्या तारखांकडे लागले आहे. व्हॉटस्टपवर काही मंडळी खोडसाळपणे तारखा जाहीर करून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखांबाबत सोशल मिडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सोशल मिडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. निकालाच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोणतीही तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या अनधिकृत तारखांवर विश्वास न ठेवता बोर्डाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या तारखांकडे लक्ष ठेवावे.
- भावना राजनोर
सहाय्यक सचिव, कोकण मंडळ