रन फॉर बायोडायव्हर्सिटीचा संकल्प घेत २०२५ च्या पहिल्या रविवारी रत्नागिरी होणार धावनगरी
By मेहरून नाकाडे | Published: March 18, 2024 04:17 PM2024-03-18T16:17:39+5:302024-03-18T16:19:40+5:30
जिल्हा पोलिस व प्रशासन यामध्ये सहभागी होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी यांनी केले.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : ‘रन फॉर बायोडायव्हर्सिटी’ ही संकल्पना खूप चांगली आहे. कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालतो. निसर्गाचे संवर्धन, जतन करणे सर्वांची जबाबदारी असून समुद्रकिनारे, कांदळवन, पक्षी, सह्याद्री रांगा संवर्धन महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनात गैरसमज असतात. ते दूर केले पाहिजेत. भाजावळ केल्यामुळे पिक चांगले येते, असा गैरसमज आहे. मात्र तिथले गवत जळाल्याने पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांचे नुकसान होते. बिया जळून जातात. यानिमित्ताने हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करूया. जिल्हा पोलिस व प्रशासन यामध्ये सहभागी होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी यांनी केले.
यावर्षीच्या नववर्षाच्या पहिल्या रविवारी सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे पहिली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन घेण्यात आली. पुढील वर्षीच्या (२०२५) हाफ मॅरेथॉनसाठी रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेण्यात आली आहे. या संकल्पेनेचे संगणकीय कळ दाबून उद्गघाटन नुकतेच पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड, हॉटेल असोसिएशनचे सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे दर्शन जाधव, नीलेश शाह उपस्थित होते.
सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांनी पहिली मॅरेथॉन ’रन फॉर एज्युकेशन’ या संकल्पनेवर झाली. दुसऱ्या पर्वाच्या मॅरेथॉनमध्ये ‘रन फॉर बायोडायव्हर्सिटी’ या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना आवाहन करणार आहोत. धावनगरी रत्नागिरीमध्ये जेवढे स्पर्धक धावतील तेवढी झाडे आम्ही जगवू. त्यासाठी १०० शेतकरी शोधणार असून ते वेगवेगळ्या ठिकाणी ती झाडे जगवतील, असा निश्चय केला असल्याचे सांगितले.