रुपेश कोत्रे दोन वर्षांसाठी हद्दपार, अनेक गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:06 PM2019-03-27T18:06:31+5:302019-03-27T18:11:04+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात २००८ सालापासून खून, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण या सारख्या ११ दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या व शिक्षाही झालेल्या रुपेश दयानंद कोत्रे (रा. शेवरवाडी, ता. लांजा) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६(१) नुसार रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश राजापूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २००८ सालापासून खून, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण या सारख्या ११ दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या व शिक्षाही झालेल्या रुपेश दयानंद कोत्रे (रा. शेवरवाडी, ता. लांजा) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६(१) नुसार रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश राजापूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रुपेश दयानंद कोत्रे याच्याविरुध्द लांजा पोलीस स्थानकात ठिकाणी सन २००८ पासून खुन, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी नोकारास मारहाण वगैरे यासारखे एकुण ११ दखलपात्र गुन्हे व १४ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २ गुन्हयांमध्ये त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे.
रुपेश कोत्रे याच्या अशा वर्तणुकीमुळे लोक त्याच्या विरोधात उघडपणे बोलत नाहीत. त्यामुळे त्याचे मनोबल वाढून तो अशाच प्रकारे गुन्हे करीत रहाण्याची शक्यता होती. त्याच्यावर कायद्याचा वचक बसविणे आवश्यक असल्याने तसेच यापुढे असे गुन्हेगार तयार होऊ नयेत, त्यांच्याकडून समाजातील व्यक्तींच्या जिवितास, मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये, तसेच समाजमन शांत अन् व्यवस्थित रहावे त्याचप्रमाणे जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठीच ही कारवाई राजापूर उपविभागीय दंडाधिकाºयांकडून त्याच्यावर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन विशेष काळजी घेत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
आणखीही हद्दपारीचे प्रस्ताव
लोकसभा निवडणुक शांततेमध्ये व निर्भय वातावरणामध्ये होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने हे जिल्हयातील अशाच प्रकारच्या अन्य गुन्हेगारांची पडताळणी करीत आहेत. अशा गुन्हेगारांचा गुन्हेगारीचा तपशील तयार करुन त्यांच्याविरुध्दही मुंबई पोलीस कायदा कलम ५६ व ५७ नुसार हद्दपारीचे प्रस्ताव संबंधीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहेत.