रूपेश पवार यांनी केली गादीवाफ्यावर भात बियाणे पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:16+5:302021-06-11T04:22:16+5:30

दापाेली : मंडणगड तालुक्यातील विन्हे येथील प्रयोगशील शेतकरी रूपेश पवार हे दोन्ही पायाने १०० टक्के दिव्यांग असूनही ...

Rupesh Pawar sowed paddy seeds on the bed | रूपेश पवार यांनी केली गादीवाफ्यावर भात बियाणे पेरणी

रूपेश पवार यांनी केली गादीवाफ्यावर भात बियाणे पेरणी

Next

दापाेली : मंडणगड तालुक्यातील विन्हे येथील प्रयोगशील शेतकरी रूपेश पवार हे दोन्ही पायाने १०० टक्के दिव्यांग असूनही त्यांची शेतीतील विविध प्रयोग करण्याची धडपड वाखाणण्यासारखी आहे. अपंगत्वावर मात करत ते आजही सुखी समाधानाने शेती करत आहेत. पंचायत समिती मंडणगडच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदा गादीवाफ्यावर भात पेरणीचा प्रयोग त्यांनी केला आहे.

सध्या भात शेतीचा हंगाम सुरू आहे. चारसूत्री, एसआरटीचे नवनवीन तंत्रज्ञान आले तरीही बहुतांशी शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने भातशेती करीत आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये पालापाचोळा, शेणी, गवत भाजून भाजवळ करण्याची, दाढ भाजण्याच्या पद्धतीचा शेतकरी आजही अवलंब करीत आहेत. या पद्धतीने रोपे तयार केली तर लावणीच्या वेळी रोपे काढायला भरपूर वेळ लागतो व रोपेही तुटतात.

मात्र, हाच भात गादीवाफ्यावर रांगेत पेरला की रोपे काढायला हलकी असतात, वेळ कमी लागतो, बियाणेही कमी लागते. रोपेही तुटत नाहीत. अशा पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांना केली. पौनीकर व त्यांचे सहकारी कृषी विस्तार अधिकारी पवन गोसावी यांनी माझ्या शेतावर येऊन गादीवाफा तयार करून त्यावर भात पेरण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याची माहिती रूपेश पवार यांनी दिली. यासाठी अराईज - ६४४४ या संकरीत बियाण्याचा वापर करण्यात आला. दापोली कोकण कृषी विद्यापीठ मंडणगड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी रूपेश पवार शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

Web Title: Rupesh Pawar sowed paddy seeds on the bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.