ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

By admin | Published: April 10, 2016 09:35 PM2016-04-10T21:35:08+5:302016-04-11T00:55:18+5:30

खेड तालुका : पाणीटंचाईची दाहकता अधिक; आजही ३२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

Rural water supply crisis | ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

Next

श्रीकांत चाळके --खेड तालुक्यातील खेड्यापाड्यात आजही पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते़ विविध जलस्रोत उपलब्ध असतानाही निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत़ याकडे लक्ष देण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही वेळ नसल्याने सारे जलस्रोतच संकटात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात आणि विशेषत: धनगरवाड्यांमध्ये आजही पाणी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़
खेड तालुक्यातील ३२ गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये तर ही समस्या अधिकच जटील झाली आहे़ तालुक्यात नदी, ओढे, नाले यासारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत़ यातील बरेच जलस्रोत हे गाळांनी भरले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधिंनीही या जलस्रोतांकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे ते विकसित झालेले नाहीत़
पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा जास्त कल आहे. जुन्या योजना दुरूस्त करुन वेळ मारून न्यायचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत. शासनाकडून तालुक्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत़ मात्र, या बंधाऱ्यांमध्येही पाण्याचा खडखडाटच आहे.
या बंधाऱ्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला असल्याने या गावांनाही पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या १५ वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदींसह इतर छोट्या, मोठ्या नद्यांकडेही दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे़ पाणीटंंचाई काळात जगबुडी नदीवरच मोठा भार पडत आहे़ खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे़
या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ हा गाळ काढण्याचा प्रयत्न खेड नगरपालिकेकडून होत आहे़ मात्र, लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण अधिकाधिक गाळात रूतत चालले आहे. मागील काही महिन्यांपासून या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे़ मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा नसल्याने प्रतिवर्षी खेड शहराची तहान पिंपळवाडी धरण भागवित आहे़ याच धरणातून १ एप्रिलपासून खेड शहराला पाणीपुरवठा होत आहे.
जगबुडी नदीचा सुकिवलीमध्ये शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याशी संगम झाला आहे़ या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहराला देखील पुरविले जात आहे़ तर उर्वरित पाणी हे खाडीला मिळत असल्याने खाडीपट्टा भागातील जनतेला मार्च महिन्यापासून तात्पुरत्या नैसर्गिक जलस्रोतांंवरच अवलंबून राहावे लागते. तसेच या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे़ नैसर्गिक जलस्रोतांचा विचार करून त्यावर उपाययोजना न केल्याने पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या जलस्रोतांचे जतन केल्यास निश्चितच पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते.

पाणी खाडीला : जलस्रोतांवर बागायती
तालुक्यातील बहुतांश नद्यांचे पाणी पूर्व पश्चिम उतारामुळे खाडीला मिळते़ यातूनच पारंपरिक जलस्रोतांना पाणी मिळते़ या जलस्रोतांच्या आधारेच गावांमध्ये शेती तसेच बागायती केली जाते़ शेती व बागायतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने या नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी हे मार्च महिन्यातच संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.

नैसर्गिक स्रोतांचे झरे लुप्त...
या भागातील प्रदूषणामुळे नैसर्गिक स्रोतांंचे झरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़ नैसर्गिक स्रोत असलेली ठिकाणे वाचविण्यासाठी ग्रामपातळीवर व शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Rural water supply crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.